अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

 पुणे : युती तोडण्यापेक्षा भाजपला जोडण्यात रस आहे. त्यामुळे जनतेचा सूड घेण्याचा एककलमी कार्यक्रम पंधरा वर्षे राबविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मगरमिठीतून राज्याच्या जनतेला बाहेर काढण्याच्या हेतूने भाजपने शिवसेनेकडे युतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. युतीबाबतचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे. युती झाल्यास एकत्र लढू अन्यथा एकटे लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवू, असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केला.

विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आयोजित आढावा बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलत होते. भाजप-शिवसेना युती, एकनाथ खडसेंवरील आरोप, कर्नाटक विधानसभेतील भाजपचे सत्तारोहण याबाबत त्यांनी भाष्य केले.

मुनगंटीवार म्हणाले, भाजप आणि शिवसेना एकाच विचारांचे पक्ष असल्याने भाजपने युतीबाबत मत व्यक्त केले आहे. आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

खडसेंबाबत ते म्हणाले, एकनाथ खडसेंवर आरोप झाल्यानंतर सरकारने त्यांची चौकशी केली. नियमाच्या चौकटीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार खडसेंची चौकशी केली असून लाचलुचपत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या शपथपत्राबाबत आक्षेप असलेल्यांनी माध्यमांमधून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांच्याजवळ असलेले पुरावे न्यायालयात सादर करावेत.

काँग्रेस, जनता दल सेक्युलरला कशाची भीती?

कर्नाटकात राज्यपालांनी घेतलेला निर्णय घटनेच्या चौकटीत बसणारा आहे. या आधी देखील अनेक राज्यात असे घडले असून सर्वाधिक जागा प्राप्त करणाऱ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले जाते. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित असून सर्वात छोटय़ा पक्षाला सत्ता स्थापन करण्याचा अधिकार द्यायचा का, असा सवाल करत कर्नाटकच्या राज्यपालांनी सद्सद्विवेकाने प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेतला आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, १९९८ मधील लोकसभेतील काँग्रेस नेत्यांची भाषणे काढून पाहिली, तर ही भाषणे प्रत्येक राज्यपालांना दिशादर्शक आहेत. त्यामुळे राज्यपालांवर ठपका ठेवण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. भाजपला कर्नाटकात बहुमत सिद्ध करावे लागणार असून तसे न केल्यास आम्ही पायउतार होऊ. तसेच काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे तेथे ‘दूध का दूध पानी का पानी’ होईलच. मग काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर पक्षाला कशाची भीती वाटत आहे.