राज्यातील सत्तेत शिवसेनेला नाईलाजाने सहभागी करून घ्यावे लागल्याबद्दल अमित शहा जाहीरपणे खंत व्यक्त करत असताना शिवसेनेला काहीचं वाटत नाही. शिवसेनेत स्वाभिमान उरला नसल्यामुळेच ते ही विधाने निमुटपणे सहन करून घेत आहेत. कारण, बाळासाहेबांच्या काळातील आणि आत्ताच्या शिवसेनेत खूप फरक आहे. बाळासाहेबांच्या काळात असलेला शिवसेनेचा स्वाभिमान आता शिल्लक राहिला नसल्याची खोचक टीका शरद पवार यांनी केली . मात्र, यदाकदाचित शिवसेनेचा स्वाभिमान जागा झाला तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीतही पवारांनी वर्तविले आहे. दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्गमध्ये असताना पवार बोलत होते.
गेल्या काही दिवसांत भाजपच्या अनेक नेत्यांकडून स्वबळावर लढण्याचा नारा दिला जाताना दिसत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा हेदेखील विधानसभा निवडणुकांच्यावेळी शिवसेनेबरोबर लढण्यास उत्सुक नव्हते. मात्र, निकालानंतर विधानसभेतील संख्याबळ जुळवून आणण्यासाठी भाजपला नाईलाजाने सेनेची मदत घ्यावी लागली होती. त्याबद्दल अमित शहांसह भाजपमधील अनेकजणांकडून सातत्याने खंत व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे ताजे विधान शिवसेनेला डिवचणारे आहे. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावर अद्याप शिवसेनेच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.