News Flash

जमीन न मिळाल्यास औष्णिक प्रकल्प रद्द अजित पवार यांचा इशारा

प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पुरेशी जमीन उपलब्ध करून दिली नाही तर दोंडाईचा (शिंदखेडा) येथील औष्णिक प्रकल्प रद्द करावा लागेल, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या

| June 2, 2013 01:30 am

प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पुरेशी जमीन उपलब्ध करून दिली नाही तर दोंडाईचा (शिंदखेडा) येथील औष्णिक प्रकल्प रद्द करावा लागेल, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वीज प्रकल्पाचे भवितव्य अखेर जमीन मालकांच्याच हाती असल्याचे अधोरेखित केले.पवार यांनी शनिवारी साक्री येथील ‘सोलर सिटी’ प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आ. जयकुमार रावल आदी उपस्थित होते. पाणी, कोळसा, गॅस आणि वारा यांच्यासह अन्य पर्यायातून विजेची निर्मिती होत असली तरी वीज उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्वच बाबींवर कधीना कधी मर्यादा येणार आहेत. यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासारखी वीजनिर्मितीची माध्यमे दीर्घकाळ वीज पुरवू शकतील. जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारला गेलेला साक्री तालुक्यातील हा महाकाय वीज प्रकल्प असल्याचा उल्लेख पवार यांनी आवर्जून केला. वन विभागाकडील जमिनीसाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. यामुळे प्रकल्पाच्या पूर्ततेला विलंब झाला. दरम्यानच्या काळात प्रकल्प बंद पडला, अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार, अशा वावडय़ा उठविल्या गेल्या. या प्रकल्पाबद्दल उलटसुलट चर्चा घडवून राजकीय लाभ उचलण्याचे प्रयत्न झाले, असेही पवार यांनी सांगितले.
दोंडाईचा येथील औष्णिक प्रकल्पाबाबत पवार यांनी कठोर भूमिका ठेवल्याचे स्पष्ट झाले. ज्या जमिनींना फारशी किंमत मिळत नव्हती, त्या जमिनीला दहा लाख रुपये भाव देण्याची तयारी आघाडी शासनाने ठेवली असताना प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन जर उपलब्ध होणार नसेल तर या प्रकल्पाचे कामच रद्द करावे लागेल, असे भाकीत पवार यांनी वर्तविले. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्य़ाचे नाव सर्वदूर पोहोचणार आहे. विजेची गरज भागविण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन करण्याची सूचनाही पवार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:30 am

Web Title: if the land not receive then thermal project may canceled ajit pawar
Next Stories
1 सिंधुदुर्गात दमदार पावसाचे आगमन
2 हेमंत गोडसेंचा मनसेला रामराम
3 चोपडय़ात विवाहितेवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X