राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याच्यादृष्टीने भाजपने आणखी एक महत्त्वपूर्ण डाव टाकला आहे. भाजपने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर त्याचा आनंदच आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील उंब्रज इथे पाटील बोलत होते. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. आदरणीय असलेल्या उदयनराजेंना आम्ही मुजरा करतो. ते जर भाजपमध्ये आले तर आनंदच आहे, असे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच सातारा येथील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सातारा जिल्ह्य़ाात उदयनराजेंचा राष्ट्रवादीशी असलेला सवतासुभा जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्याबद्दल पवार काय बोलणार याकडे सगळय़ांचे लक्ष होते. पवारांनी शेंद्रे येथील कार्यक्रमात उदयनराजे यांच्याबद्दल थेटपणे बोलणे टाळले. परंतु, पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले होते. शरद पवार यांनी उदयनराजे आणि ते स्थापन करत असलेल्या आघाडीसंदर्भात एकही शब्द उच्चारला नाही, मात्र यावेळी रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सडकून टीका करत त्यांच्या दहशतीला आम्ही घाबरत नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या उदयनराजे यांना पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. साताऱ्यातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान याच रणनीतीचा एक भाग असू शकतो. माजी आमदार भाऊसाहेब मुणग यांच्या मुलाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही मोठी रांग आहे, असा दावाही पाटील यांनी केला. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याशिवाय, मराठा मोर्च्यांनंतर राज्य सरकारकडून राज्य पर्यटन विभागाच्या सदिच्छादूतपदी (ब्रँड अम्बेसेडर) खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशानेच हे पाऊल उचलण्यात आले होते. गेल्या काही काळात भाजपमधील मराठा चेहरा म्हणून संभाजीराजेंची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे काही दिवसांपूर्वी नांदेड येथील मराठा मोर्चात सहभागी झाले होते.