राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर भरीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी टीका केली. राम मंदिर बांधून पोट भरणार असेल तर आमचा पाठिंबा असेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राम मंदिर बांधूनही बेरोजगारी, कुपोषण हे प्रश्न कायम रहाणार असतील तर त्याचा उपयोग काय ? अशी टीका त्यांनी केली. ते छत्रपती शिवाजी स्टेडीयम मंगळवार पेठ येथील सभेत बोलत होते.

दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला.

मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. या सर्वांनी आयोगासमोर उपस्थित राहावे. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. त्या समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या अहवालाशी सहमत नसून पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावाही त्यांनी केला.