देशातील प्रत्येक विद्यापीठात पहिल्या दहा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपकी आठ मुली असतात. मात्र, जीवनातील विविध क्षेत्रांत त्यांना पुन्हा संधी मिळत नाही. ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणातून ज्या ठिकाणी महिलांना संधी दिलेली आहे, असे उद्योग नफ्यात चालतात हे आढळून आले आहे. म्हणूनच महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

राजर्षी शाहू महाविद्यालय व लायन्स क्लबच्यावतीने ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. व्यासपीठावर डॉ. गोपाळराव पाटील, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू दिलीप म्हैसेकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव आदी उपस्थित होते.

राव म्हणाले, भारत हा वेगाने बदलतो आहे. २०२० साली जगातील तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जाणार असून या देशातील सरासरी वय २९ वष्रे असणार असून चीन व अमेरिकेच्या तुलनेत ते आठ वर्षांने कमी आहे. या देशातील तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम व्हायला हवे अन्यथा आपत्तीजनक स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. नालंदा, तक्षशीला अशा विद्यापीठांची आपल्याकडे परंपरा होती. शेकडो वष्रे जगाला दिशा देण्याचे काम भारताने केले. भास्काराचार्यानी ८०० वर्षांपूर्वी गणितात जे संशोधन केले त्याचे जगाला आश्चर्य वाटते. जळगाव जिल्हय़ातील चाळीसगाव तालुक्यातील पट्टादेवी या त्यांच्या गावात जगभरातून लोक येतात. आपल्याकडे जे जुने चांगले होते त्यातील चांगल्या बाबी घेऊन नवीन युगाकडे वाटचाल केली पाहिजे. पाश्चात्त्यातील सर्वकाही वाईट आहे ही संकल्पना चुकीची असून पाश्चात्त्यांकडील जे चांगले आहे त्याचे अनुकरण करण्याला कोणीही विरोध केलेला नाही. ‘वसुधव कुटुंबकम्’ या कल्पनेतूनच काम होण्याची गरज आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे शिक्षण ही आजच्या काळाची गरज असून त्यादृष्टीने विविध क्षेत्रांत संशोधन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

प्राचीन काळात आयुर्वेदाचा अभ्यास मोठा होता. सुश्रुतसंहिता, चरकसंहिता याबद्दल जगात कुतूहल आहे. भारताची जगाला औद्योगिक देश म्हणून ओळख होती. १७१५ साली जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून भारत ओळखला जात होता. इंग्रजाच्या राजवटीत आपल्या शिक्षण पद्धतीवर आक्रमण झाले व केवळ नोकरी मिळविणारे शिक्षण सुरू झाले. आता भारत वेगाने बदलतो आहे. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन, शिक्षकभरती या सर्व विषयात काळजी करण्याची गरज आहे.  शिक्षण संस्थाचालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अवघड वळण नको आहे. सोपा व सहज रस्ता सर्वाना हवा आहे. त्यातून समस्या वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २०० अभियांत्रिकी महाविद्यालये पुरेसे विद्यार्थी नाहीत म्हणून बंद होत आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षणक्षेत्र कोणत्या दिशेने बदलते आहे हे लक्षात घेऊन आपल्याला शिक्षणात बदल केले पाहिजेत. मुलींना शिक्षणात संधी देत असतानाच नोकरी व व्यवसायात गुणवान मुली हरवून जातात. त्यांना अधिक संधी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी केंद्रीत शिक्षण दिले तर शिक्षणात चांगले बदल होतील, असेही ते म्हणाले.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी,  इलेक्ट्रॉनिक्स व जेनेटिक्स हे विषय जगभर महत्त्वपूर्ण असून या विषयात सखोल अभ्यास व्हायला हवा. ज्ञानाच्या कक्षा जितक्या वाढवता येतील तितक्या वाढवल्या पाहिजेत. शिक्षणक्षेत्रात प्रचंड संधी आहेत. केवळ पोटभरू शिक्षण हा हेतू न ठेवता ज्ञानाच्या लालसेने शिक्षणाकडे पाहिले गेले पाहिजे. आगामी काळात ग्रंथालय, प्रयोगशाळा व सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षणाची कवाडे खुली होणार असल्याचे ते म्हणाले.

विवेकानंद मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर संचलित विवेकानंद कर्करोग रुग्णालयास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी भेट दिली. रुग्णालयात कर्करोग रोगावरील उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या अद्ययावत यंत्रसामुग्रीची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा देवधर यांनी कोबाल्ट व लिनियर एक्सलेटर यंत्रसामुग्रीची माहिती याप्रसंगी दिली.