शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या शेर वरून देखील फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. “चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आदींची उपस्थिती होती.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स

एकनाथ खडसे यांच्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस पाठवल्या गेली, यावर आपलं काय म्हणणं आहे. असं माध्यमांकडून सर्वप्रथम विचारण्यात आल्यावर फडणवीस म्हणाले की, “मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. याबाबत तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे.”

तसेच, कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपावर आरोप केले जातात, भाजपाला समोर केलं जातं, याबाबत जेव्हा पत्रकारांनी फडणवीस यांना विचारलं तेव्हा यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “माझं असं म्हणणं आहे की चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही. नीट जाऊन त्याला उत्तर देता येतं. आता मिळाली कुणाला, कुणाली नाही मिळाली, हे मला माहिती नाही. कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही.”

तर, वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया.. असं ट्विट केलं आहे. हे जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांना सांगितलं तेव्हा, “ते असे रोजच ट्विट करत असतात. संजय राऊतांमध्ये खूप प्रतिभा आहे, त्यांना अनेक शेर पाठ आहेत, अनेक गाणी पाठ आहेत. त्यामुळे त्यांना जेव्हा दुसरं काम नसतं, तेव्हा ते एखादा शेर ट्विट करतात, एखादं गाणं ट्विट करतात. त्यामुळे त्यावर उत्तर आम्ही कशाला द्यायचं?” असं म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.