वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाने व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश शुल्कात भरमसाट वाढ केल्याने राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेले ताडोबा प्रकल्पातील व्याघ्र दर्शन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. प्रवेश शुल्क, वाहने आणि निवास यांच्या वाढत्या दरांमुळे खिशात दहा हजार रुपये असलेल्यांनाच ताडोबात वाघ पाहता येऊ शकतो, अशी स्थिती सध्या आहे.
राज्यात चार व्याघ्र प्रकल्प असले तरी देश-विदेशातील पहिली पसंती येथून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडोबाला असते. या प्रकल्पात वाघाचे दर्शन हमखास होते म्हणून पर्यटक गर्दी करतात. मात्र, शासनाच्याच धोरणांमुळे सर्वसामान्य पर्यटकांचा हा आनंद हिरावून नेला जात आहे. या प्रकल्पात आधी प्रतिव्यक्ती २५ रुपये व वाहनासाठी ५० रुपये असे शुल्क होते. आता एका वाहनात बसलेल्या व्यक्तींसाठी १ हजार रुपये शुल्क सोमवार ते शुक्रवार या दिवसात आकारले जाते. शनिवार, रविवार व इतर शासकीय सुटीच्या दिवशी हे शुल्क १२०० रुपये करण्यात आले आहे. यात गाइडच्या शुल्काचासुद्धा समावेश आहे.
व्याघ्र सफारीसाठी जाताना प्रवेशद्वारावरून वाहन भाडय़ाने घ्यावे लागते. येथे २० किलोमीटरच्या एका फेरीसाठी १८०० रुपये मोजावे लागतात. दिवसात दोन फेऱ्या करायच्या असल्यास दुप्पट पैसे मोजावे लागतात. ताडोबात वनखात्याने निवासाचीही सोय केलेली नाही. प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असलेल्या खासगी हॉटेल व रिसॉर्टचे दर एका खोलीसाठी ३ हजार रुपये आहेत. हा एकंदर खर्च पाहता खिशात दहा हजार रुपये ठेवूनच ‘व्याघ्रसफारी’ला जाण्याचे धारिष्टय़ करावे लागते. या संदर्भात ताडोबाचे विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ यांच्याशी संपर्क साधला असता दर ठरवण्याचे अधिकार शासनाला आहेत असे ते म्हणाले.  
ताडोबाचे ‘लाडोबा’
ताडोबात रोज ६० वाहनांना प्रवेश दिला जातो. यानंतरही कुणाला प्रवेश हवा असेल तर नामवंत वन्यजीवतज्ज्ञ बिट्ट सहगल यांचे ‘वाइल्ड महाराष्ट्र’ हे १५०० रुपये किमतीचे पुस्तक खरेदी करावे लागते. इतक्या दूरवर आल्याने १५०० रुपये खर्चण्यावाचून पर्याय नसतो. या खरेदीनंतरच दोघांना प्रवेश देण्यात येतो. एखाद्या लेखकाचे पुस्तक घेण्याची अजब सक्ती करण्याच्या वनखात्याच्या या अजब संशयास्पद निर्णयाने या लेखक ‘लाडोबां’बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
पुस्तकाचा भरुदड
 ताडोबात रोज ६० वाहनांना प्रवेश दिला जातो. यानंतरही कुणाला प्रवेश हवा असेल तर नामवंत वन्यजीव तज्ज्ञ बिट्ट सहगल यांचे ‘वाइल्ड महाराष्ट्र’ हे १५०० रुपये किमतीचे पुस्तक खरेदी करावे लागते. या खरेदीनंतर दोघांना प्रवेश देण्यात येतो. हा अजब निर्णय वनखात्याच्या नियामक मंडळाने घेतलेला आहे.

बजेट व्याघ्रसफारीचे!
*    प्रवेश शुल्क १००० ते १२००
*    प्रकल्पातील वाहनखर्च ३६०० ते ४०००
*    निवास सुविधा ३०००च्या पुढे

 केवळ उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंतांनीच वाघ बघायचा काय? देशातील अनेक   व्याघ्र प्रकल्पात सर्वसामान्यांना फिरता यावे यासाठी मिनी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत येथेही अशी बससेवा होती. नंतर ती बंद करण्यात आली. ही बससेवा बंद झाल्यापासून सहल वा अभ्यासाच्या निमित्ताने ताडोबात जाऊ इच्छिणारे हजारो शाळकरी विद्यार्थी या आनंदापासून मुकले आहेत.
– सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष