औरंगाबाद शहरात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट (आयआयएम) स्थापन करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर २०० एकर जागेच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.
येथे आयआयएम स्थापन व्हावे, या दृष्टीने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (सीएमआयए) सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव अमरजित सिन्हा यांनी राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांना गेल्या १० ऑक्टोबरला पत्र पाठविले. आयएमआयसाठी राज्यात सुयोग्य ठिकाणी २०० एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, ही जागा शहर रस्ते, रेल्वे व विमानाने जोडलेली असावी, असे या पत्रात म्हटले आहे. मनुष्यबळ मंत्रालयास राज्याशी या संदर्भात संपर्क साधता यावा, या साठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्याच्याशी संपर्क साधून आयएमआय स्थापन करण्यासाठी जागा निवड समिती राज्याला भेट देईल, असेही पत्रात म्हटले आहे.
पत्राच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांनी २७ ऑक्टोबरला तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांना राज्यात आयएमआय स्थापन करण्यासाठी सुयोग्य जागेचा शोध घेऊन डीपीआर तयार करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करावा, अशी विनंती केली. या पाश्र्वभूमीवर सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे व तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे प्रभारी सहसंचालक महेश शिवणकर यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांची भेट घेऊन औरंगाबाद शहराजवळ २०० एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात शुक्रवारी निवेदन दिले. सीएमआयए, विविध उद्योगसमूह व शिक्षणतज्ज्ञ यांनी मागील काही काळापासून औरंगाबाद येथे आयआयएम व्हावे, या दृष्टीने विविध स्तरांवर पाठपुरावा चालविला आहे. शुक्रवारच्या भेटीनंतर सीएमआयएने आयआयएमसाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री व तंत्रशिक्षण मंत्री यांना पाठविले आहे.