सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुमारे ९९० गोण्या तांदूळ तीन मालमोटारींद्वारे गुजरातमध्ये अवैधपणे नेण्यात येत असताना पोलिसांनी जप्त केल्या. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास धुळे-औरंगाबाद महामार्गावर मोहाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली. चाळीसगाव चौफुलीवर केलेल्या या कारवाईत मालमोटारी आणि प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ९९० गोण्या असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
परवेज जाफर व संतोष गंगावल या दोघांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील विविध ठिकाणांहून सार्वजनिक वितरणाचा तांदूळ जमा केला. त्यावर प्रक्रिया करून ‘परिमल राइस १६०१५ व १५९९५’ असे बनावट नाव तांदळांच्या गोण्यांसाठी धारण केले. शासकीय गोणपाटातील हा तांदूळ प्लास्टिकच्या गोणीत भरून ‘आर. जे. इंटरप्रायजेस ग्रीन र्मचट अ‍ॅण्ड सप्लायर्स, चिखलठाणा (औरंगाबाद)’ अशा शीर्षकाखाली तयार ठेवला. हा सर्व तांदूळ नवसारी (गुजरात) येथील अ‍ॅडव्हान्स राइस मिलचे मालक व दलाल हेमलभाई, सिद्धिविनायक व महावीर अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजच्या मालकांच्या माध्यमातून गुजरात राज्यात चढय़ा भावाने विकण्यासाठी वेगवेगळ्या तीन मालमोटारींमधून रवाना केला. परप्रांतीय मोटारचालक देवराम बिष्र्णो, इंद्रयेश वर्मा, अखिलेशकुमार वर्मा, औरंगाबाद येथील चेतक ट्रान्सपोर्टचे मालक हनुमान चौधरी आणि चौधरी फ्रंट करिअरचे मालक वगतराम चौधरी यांच्या माध्यमातून तांदळाचा हा काळाबाजार सुरू होता, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा चालकांना अटक करण्यात आली आहे.