गावं तशी चांगली, पण.. भाग १

द्राक्षं परदेशात पाठवून राज्यासाठी मात्र नामानिराळी राहिलेली सांगली</strong>मिरजजवळची छोटुकली गावं एकाएकी देशाच्या वृत्तपटलावर दाखल झाली. एका महिलेच्या मृत्यूनंतर स्त्रीभ्रूणहत्येसाठी अवैध गर्भपात करणारा इथला एक क्रूर उद्योग समोर आला. वरवर आधुनिकतेचे वारे वाहू लागलेल्या गावागावांमध्ये चिवट, बुरसट मानसिकतेमुळे किती पराकोटीच्या अमानवी घटना घडू शकतात, याचे प्रातिनिधिक उदाहरण मणेराजुरी, म्हैसाळमधील हा प्रकार आहे. या भागांत लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी केलेल्या पायपिटीतून समोर आलेल्या सत्यांशाची मालिका आजपासून ..

स्वातीची गोष्ट

एक मार्च रोजी म्हैसाळ येथे गर्भपात करताना मृत्यू झालेली स्वाती प्रवीण जमदाडे तासगावजवळच्या मणेराजुरीची. मूळच्या खंडेराजुरीच्या स्वातीचे आई-वडिलांचा पाँडिचेरीला सोने गाळपाचा व्यवसाय. ‘‘तीन लाख हुंडा, १५ तोळे सोनं आणि सगळा संसार देऊन आम्ही स्वातीचे प्रवीणशी लग्न करून दिले होते.. स्वातीला गर्भपात करायचा नव्हता..’’ स्वातीचे वडील सुनील जाधव सांगतात. प्रवीण आणि स्वाती यांना चार वर्षांची स्वरांजली आणि दीड वर्षांची प्रांजली अशा दोन मुली. तिसरा मुलगाच हवा म्हणून कागवाड येथील श्रीहरी घोडके याच्याकडे स्वातीची सोनोग्राफी करण्यात आली आणि मुलगीच असल्याचे कळल्यावर तिला खिद्रापुरे याच्याकडे गर्भपातासाठी दाखल करण्यात आले. गर्भपातादरम्यान तिचा मृत्यू झाला.

स्वातीच्या मृत्यूची हळहळ मणेराजुरी, म्हैसाळ या गावांबरोबरच आजूबाजूच्या परिसरांत दिसते. घडलेली घटना वाईट होती, हे सगळ्यांना मान्य असले तरी ती चुकीची होती असे मात्र कुणाला वाटत नाही.

गाव काय म्हणतंय?

गावांत जमदाडेंची मोठी वाडी आहे. तरीही जमदाडेंचे ‘ते’ घर शोधण्यास कुणाला काही अडचण येत नाही. माध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते गावांत आल्यावर जमदाडेंच्या घरी पोहोचण्यापूर्वी घरात कोणी येणार असल्याचा निरोप बरोबर पोहोचतो. घरही मग ठाशीव उत्तरे देण्यासाठी सरसावून बसते. दोन मुलींवर पुन्हा मुलगी नको म्हणणाऱ्या कुटुंबात आधीच्या दोन मुलींची अवस्था काय दिसेल याबद्दलचा अंदाज कुटुंबीय चुकवतात. छान आवरून तयार केलेल्या स्वातीच्या मुलींना पाहुण्यांसमोर उभे केले जाते. गावातील नागरिकांप्रमाणे जमदाडे कुटुंबालाही हा प्रवीण आणि स्वातीचा आपापसातील प्रश्न वाटतो. ‘त्या नवराबायकोची चूक झाली. स्वातीच्या माहेरचे लोक आम्हालाही अडकवायला बघताहेत. प्रवीणला आत्ता लगेच जामीन मिळणार नाही कदाचित, पण प्रकरण शांत झाल्यावर सोडतील,’ असे प्रवीणचे कुटुंबीय सांगतात.

प्रवीणचे चुलत चुलते मोहन जमदाडे म्हणतात, ‘प्रवीणने गुन्हा केला हे मान्य आहे. पण शेती पाहण्यासाठी मुलगा हवा असे त्यांना वाटलेले असू शकेल. पुरुषाला आपल्या बायकोच्या मनात काय आहे हे माहीत असते. यामध्ये फक्त प्रवीणची चूक कशी?..’

आता चर्चा कसल्या?

छोटय़ाशा जागेत दवाखाना असलेल्या खिद्रापुरेचे रुग्णालय पाहता पाहता कोटय़वधींच्या मालमत्तेत पालटले. यामागचे गमक गावाला माहिती आहे. खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये तळघर आणि तेथे होणाऱ्या प्रकारांबाबत सगळा गाव परिचित होता. रुग्णालयाच्या मागील बाजूने गाडी कशी आतपर्यंत जायची आणि सगळे प्रकार रात्रीतच कसे उरकले जायचे याच्या कथा आता कट्टे-पारांवर चघळल्या जात आहेत. खिद्रापुरे व घोडके यांचे कर्नाटकातील साथीदार आणि त्या साथीदारांचे म्हैसाळमधील नातेवाईक यांच्याबाबतच्या चर्चाही मोठय़ा प्रमाणात होत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रसूतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा खिद्रापुरेच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याचे स्थानिक सांगतात.

याबाबत त्या महिलेच्या पतीला विचारले असता मात्र, ‘माझी पत्नी हृदयविकाराचा झटका येऊन गेली असे कागदावर डॉक्टरांनी लिहून दिले आहे. मला त्याबाबत काही बोलायचे नाही,’ असे त्याने सांगितले.

आमच्या गावातले खिद्रापुरेकडे कुणी जायचे नाही असे सांगतानाच ‘अशी गोष्ट कुणी आपल्या गावातल्या डॉक्टरकडे करत नाही.

रुग्णाचे या गावांत नातेवाईक असतील तर असे रुग्ण खिद्रापुरे घ्यायचा देखील नाही,’ असे गावातील एका औषधविक्रेत्याने सांगितले.

 मुलगा हवाच!

मुलगी नको यापेक्षा ‘मुलगा हवाच’ ही मानसिकता इथे दिसते. ‘स्वाती गेली हे वाईट झाले, पण तिच्या नशिबात मृत्यू होता म्हणून ती गेली, त्याला इतर कुणी काय करू शकते?’ असे जमदाडेंच्या घराशेजारी राहणारी नूरजहाँ ही कामगार महिला सांगते. पहिली मुलगी बारावीमध्ये शिकणारी आणि धाकटा मुलगा पहिलीच्या वर्गात, किंवा दोन मुलांमध्ये अगदी १२ किंवा १५ वर्षांचे अंतर अशी अनेक उदाहरणे या परिसरात पाहायला मिळतात. त्यामागे येथील नागरिकांनी राबविलेली छुपी यंत्रणाही लक्षात येते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यां उज्ज्वला परांजपे सांगतात, ‘मुलगी नको म्हणून गर्भपात करण्याचे प्रकार खेडय़ातच नाही तर सांगली-मिरज येथेही हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर चालतात. सुविधा सहज उपलब्ध झाल्यामुळे या मानसिकतेत भर पडते.’