सांगलीच्या जिल्हा रूग्णालयाजवळ असलेल्या चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. उपलब्ध कागदपत्रावरून रूग्णालयात ६ गर्भपाताची प्रकरणे घडली असून याप्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉक्टर पती-पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून आणखी एक डॉक्टर यात गुंतलेले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी,की जिल्हा शासकीय रूग्णालयाजवळ चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटल असून याठिकाणी बेकायदा गर्भपात केला जात असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. कवठेकर आणि त्यांच्या पथकाने पोलिसांसह छापा टाकला. या वेळी रूग्णालयात गर्भपात करण्यासाठी लागणारी औषधे आणि काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच या वेळी काही मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या कागदपत्रावरून या रूग्णालयात गेल्या काही दिवसामध्ये सहा गर्भपात बेकायदा करण्यात आल्याचे समोर आले असून आणखी काही संशयास्पद प्रकरणे झाली आहेत का, याची तपासणी सायंकाळपर्यंत करण्यात येत होती.

मिळालेल्या प्रारंभिक माहितीनुसार रूग्णालयातील डॉक्टर रूपाली चौगुले, विजयकुमार चौगुले आणि स्वप्नील जमदाडे या तीन डॉक्टर विरूध्द शहर पोलीस ठाण्यामध्ये गर्भपात प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. रूपाली चौगुले यांना ताब्यात घेण्यात आले असून डॉ. विजयकुमार चौगुले यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. डॉ. जमदाडे यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे गेल्या वर्षी बेकायदा गर्भपाताचे प्रकरण एका महिलेच्या मृत्यूनंतर उघडकीस आले होते. यामुळे सांगलीसह कर्नाटकामध्येही खळबळ उडाली होती.