सांगलीतील दोन निष्पाप जीव रक्ताच्या नातेवाईकांना दुरावले

पोट पाडण्यासाठी गेलेली मम्मी देवाघरी गेली, मम्मीला देवाघरी पोहोचविण्यास कारणीभूत ठरलेला बाप पोलिसांचा पाहुणचार झोडतोय, मम्मीची आई मुलीच्या विरहाने दुखात, तर पप्पांची आई रागात. अशा स्थितीत या दुर्दैवी घटनेतील चार व दीड वर्षांच्या कोवळ्या कळ्यांची होरपळ सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून मम्मी-पप्पांच्या वाटेकडे डोळे लावून हे दोन कोवळे जीव केंब मणेराजुरीत अघोषित शिक्षा भोगत आहेत.

स्वाती प्रवीण जमदाडे या २६ वर्षीय तरूणीला तिसरीही मुलगीच असल्याने अवांछित गर्भापासून मुक्ती घेण्यासाठी म्हैसाळच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले तो दिवस होता १ मार्च. याच दिवशी गर्भपात करीत असताना अतिरक्तस्त्रावाने तिच्या उदरातील न उमललेली कळी खुडत असताना नराधमाने तिच्याही स्त्रीत्वाच्या निशाणीला नख लावले. काळाने झडप घातली, उमलू पाहणाऱ्या कळीने आपल्यासोबत नाते असलेल्या मातेलाही या क्रूरतेच्या दुनियेत थांबू दिले नाही.

या अभागी मातेची स्वरांजली ही चार वर्षांची आणि प्रांजली ही दीड वर्षांची अशा कोवळ्या कळ्या देवाघरी गेलेली मम्मी आज तरी येईल या आशेवर गेले आठ दिवस वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. खंडेराजुरीच्या मम्मीच्या आईनेही या मुलींना मायेच्या पदराखाली घेण्यास नकार दिला आहे, तर पप्पांची मम्मी आजही मुलाच्या तुरूंगवासास आणि वंशाचा दिवा देण्यास असमर्थ ठरलेल्या सुनेच्या रक्ताला जवळ करण्यास कचरत आहेत.

सगळी माध्यमं क्रूरकर्माची गाढलेली भूते काढण्यात मग्न आहेत, कोणीही येतो, नराधमाला शिव्या घालत जबर शिक्षेची मागणी करत आहे. मात्र कोणतेही पाप केलेले नाही, कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही तरीसुध्दा या दोन कोवळ्या जीवांना मात्र जबर शिक्षा वाटय़ाला आली. आजही कोणी चॉकलेट दिले तरी दीड वर्षांची प्रांजली माझी मम्मी कुठाय? अशा कोरडय़ा स्वरात पुसत आहे. गेल्या आठ दिवसात दोन्ही कळ्यांनी हट्ट तर सोडाच पण अन्नालाही शिवण्याची मानसिकता राखली नाही.