बुरसटलेली मानसिकता तसेच वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तींमुळे फावले

संथ वाहणाऱ्या कृष्णाकाठच्या कसदार मातीत म्हैसाळला गेली आठ वष्रे शासकीय पातळीवर अज्ञात असलेले, मात्र ग्रामीण भागात परिचित असलेले गर्भपाताचे दुकान गेल्या आठवडय़ात उघडकीस आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा गुलालही काळा ठिक्कर पडला. १ मार्च रोजी गर्भपात करीत असताना मणेराजुरीच्या स्वाती जमदाडे या २६ वर्षांच्या विवाहितेच्या मृत्यूने मुलींच्या जन्मापूर्वीच हत्या करण्याचे रॅकेट उघडकीस आल्याने कृष्णेचा संथ प्रवाहही थरारला असेल. यामागील कारणांचा विचार करता आरोग्य विभागाचे हेतुपुरस्सर झालेले दुर्लक्ष जसे आहे, तसेच समाजातील वंशाचा दिवाच हवा ही मानसिकताही कारणीभूत असल्याचे प्रकर्षांने दिसून आले.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरीच्या स्वाती हिला दोन मुलींनंतर मुलगाच हवा या मानसिकतेतून गर्भपातासाठी म्हैसाळच्या बाबासाहेब खिद्रापुरे या नराधमाच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १ मार्च रोजी तिचा गर्भपात करीत असताना मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांचा तपास सुरू होताच समाजातील रोग दूर करण्याचा वसा घेतलेल्या खिद्रापुरे या नराधमाचे कारनामे उघडकीस येत असतानाच अनेक प्रश्नांची मालिका उभी राहत आहे.

कर्नाटकची सीमा अवघी तीन किलोमीटरवर. यामुळे दोन्ही राज्यातील रहिवाशांचा रोजचा राबता. एकाच नदीचे पाणी या सीमेवर पिण्यासाठी वापरले जात असल्याने नातेसंबंध, व्यवहार याला आडकाठी अशी नाहीच, असलाच तर मराठी-कानडी हा भाषिक वाद राजकीय कारणासाठीच कधी तरी डोके वर काढतो. मात्र देव-घेव, जाणे-येणे हे रोजचेच. कोल्हापूर जिल्’ााच्या शिरोळ तालुक्यातील गावांसाठी याच रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करावा लागतो. एका बाजूला नदीच्या पलतीराला कोल्हापूर जिल्हा तर कागवाडच्या सीमेत गेले की, बेळगाव जिल्’ाात पोहचतो.

दोन्ही राज्यांच्या पोलिसांची कायदा राबविण्याची पद्धती, राजकीय स्थिती ही वेगवेगळी असल्याने या अवैध व्यावसायिकांना एक पर्वणीच मानली जाते. सांगली-मिरजेत येऊन गुन्हे करून पुन्हा आश्रयासाठी कर्नाटकचे आमंत्रण स्थायीच आहे. याच पद्धतीने कर्नाटकात गुन्हे करून मिरजेत वास्तव्य करणे सुलभ आहे.

मिरज ही तशी वैद्यकीय नगरी, सर विल्यम वॉन्लेस या अवलियाने या ठिकाणी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून पाया रचला. आजही मिरजेत नामवंत वैद्यकीय व्यावसायिक प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, यामुळे या शहराची ख्याती सर्वदूर पसरली. मात्र गेल्या दहा-वीस वर्षांत या व्यवसायातील सेवाभाव कमी होत गेला आणि आज याला पूर्ण व्यावसायिक स्वरूप लाभले आहे. याच बरोबर अन्य व्यवसायाप्रमाणे नको त्या प्रवृत्तीही शिरल्याने वैद्यकीय सेवेचा धंदा झाला.

बुरसटलेली मानसिकता

मुलगाच पाहिजे या मानसिकतेतून कायद्याच्या बाहेर जाऊन काही उपाय करता येत असेल तर तो हवाच यातून परिस्थितीचा लाभ घेत वैद्यकीय पात्रतेचा विचार न करता दुकानदारी सुरू झाली. ग्राहक मिळतो आहे म्हटल्याबरोबर ही दुकानदारी पोषक वातावरणात बहरत गेली. मात्र यात माणुसकीच लोप पावत चालली याचा विचार करण्याची मानसिकता आजही गांभीर्याने दिसत नाही.

गर्भपाताच्या अवैध व्यवसायात अनेक जण गुंतले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. सोनोग्राफी मशीनवर िलगनिदान करण्यास कायद्याने प्रतिबंध असला तरी चार पसे जास्त मोजण्याची तयारी असली की, बऱ्याच सोनोग्राफी चालकांकडून सांकेतिक भाषेत संदेश दिले जात असल्याचे दिसते. एकदा गर्भ मुलीचा आहे हे लक्षात आले की, तिला जन्मच नाकारण्यासाठी खिद्रापुरेसारखे नराधम पशाच्या मोहातून सदैव तयारच आहेत.

आज या सीमाभागात चार-पाच हजार लोकवस्तीच्या गावातही सोनोग्राफी करून देणारी दुकाने थाटली आहेत. मात्र सीमेपलीकडे जाऊन काम करण्यास यंत्रणेला मर्यादा येत असल्या तरी जिल्’ाातील आरोग्य यंत्रणेची मानसिकताही नाही.

वादग्रस्त असलेल्या म्हैसाळच्या रुग्णालयाबाबत निनावी तक्रार मे २०१६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने केली. मात्र या पथकाने रुग्णालयात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा अहवाल तयार केला. आणि हा अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यास डॉक्टर खिद्रापुरे गेला होता. अशा आरोग्य विभागाकडून सकारात्मक कार्याची अपेक्षा कशी करायची हा प्रश्नच आहे.

ग्रामीण भागातील लोकांनी स्थानिक पातळीवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचाच आरोग्य सल्ला घ्यावा, जेणे करून गावपातळीवर असलेल्या अर्धवट ज्ञानावर वैद्यकीय सल्ला आणि उपचार करणाऱ्यांना आळा बसेल.   डॉ. राम हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी