पंढरपूर येथे राहत्या घरामध्ये पैसे घेऊन अवैधरित्या गर्भपात करताना एका महिलेला अटक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला. गर्भपात करत असतानाच तालुका पोलिसांनी या घरावर छापा टाकला. न्यायालयाने संशयित महिलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील लक्ष्मीटाकळी परिसरातील राहत असलेल्या सुनीता उर्फ जान्हवी विठ्ठल गायकवाड (वय ३८, मुळगाव हालदहीवडी ता. सांगोला, जि. सोलापूर सध्या रा. श्रीनगर, लक्ष्मीटाकळी शिवार ता, पंढरपूर) ही महिला राहत्या घरामध्ये पैसे घेऊन अवैधरित्या गर्भपात करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली. यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक हर्षल गालिंदे व गौरीशंकर शिंदे, एस.एस. पानसरे, ए.पी. गाडे, एस.एस. जगताप, महिला पोलीस डी.बी.लेंडवे, निमगरे यांनी सोमवारी दुपारी १२. ३० वाजता गायकवाडच्या घरी छापा टाकाल. त्यावेळी गायकवाड बीड येथील एका महिलेचा गर्भपात करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावून तपाणी केला असता गर्भपात करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी गायकवाडविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिला अटक करून ताब्यात घेतले होते. मंगळवारी तिला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल गालिंदे पुढील तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 27, 2017 7:11 pm