News Flash

दारूबंदीऐवजी अवैध विक्रीवर र्निबध घालणार

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्याशी भेट

मद्यविक्री निषिद्ध क्षेत्र आता २२० मीटरवर

उत्पादन शुल्क आयुक्त राधा यांची माहिती; राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्याशी भेट

दारूबंदी केल्याने अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट होतो, असा अनुभव असल्याचे कारण पुढे करून राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी दारूबंदीच्या मुद्याला बगल देत अवैध दारूविक्रीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यापेक्षा अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी सक्षम ग्रामसुरक्षा दलांची निर्मिती करून त्यांना कायदेशीर अधिकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात दारूबंदीची मागणी केली होती. त्यासाठी गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलांची स्थापना करून त्यांना कायदेशीर अधिकार द्यावेत, असेही हजारे यांनी सुचवले होते. हजारे यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या कायद्याचा मसुदा तयार करावा, त्या मसुद्याप्रमाणे हा कायदा करण्यासाठी शासन तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. या पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्याच्या सचिव व्ही. राधा यांनी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेतली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना राधा म्हणाल्या, हजारे यांच्या सूचनेनंतर अवैध दारूविक्रीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील ६ हजार अवैध व्यावसायिकांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, गृह व ग्रामविकास खात्याशी समन्वय साधून अशा लोकांवर कठोर कारवाई करणार आहे. हजारे यांनी सुचवलेला ग्रामसुरक्षा दलाचा पर्याय अतिशय उत्तम असून, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील तो दुवा ठरेल. हजारे यांनी ग्रामसुरक्षा दलाचा मसुदा दिला आहे. त्यात काही दुरुस्त्या तसेच काही गोष्टींची वाढ करून त्यास कायदेशीर स्वरूप देण्यात येईल.

येत्या दोन ते तीन महिन्यांत या कायद्यास मूर्त स्वरूप येईल असेही त्यांनी सांगितले. हजारे यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली होती, याची आठवण करून दिली असता त्या म्हणाल्या, राज्यात वर्धा, गडचिरोली तसेच चंद्रपूर येथे संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे तेथे अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट झाला आहे. ते पाहता दारूचे परवाने बंद करून दारूबंदी होणार नाही तर दारूबंदीसाठी समाजाचे प्रबोधन गरजेचे आहे.

चंद्रपुरात पहिला प्रयोग

ग्रामसुरक्षा दलास कायदेशीर अधिकार देण्याचा कायदा झाल्यानंतर त्याची चंद्रपूर जिल्हय़ात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सूचना राधा यांनी केली. पारनेर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:59 am

Web Title: illegal alcohol sales ban in ralegan siddhi
Next Stories
1 राज्यात कौटुंबिक न्यायालयांमध्ये ३२ हजार प्रकरणे प्रलंबित
2 राज्यातील ४० विधि महाविद्यालयांत प्रवेशाचा मार्ग खुला
3 जलप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तंबी देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्मच
Just Now!
X