राज्य उत्पादक शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खास मोहीम राबवून येथील कार्वेनाका येथे बेकायदा दारूच्या बॉक्सची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोसह ३ लाख ३४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करताना दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकाराने मुबलक प्रमाणात बेकायदा दारू वाहतूक व विक्री होत असल्यासंदर्भात शिक्कामोर्तब झाले असून, सापडलेले आरोपी आणि येनकेन मार्गाने असा प्रकार खुलेआम करणाऱ्यांवर कारवाई होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभित करण्यासाठी मद्याचा वापर होवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत कार्वेनाका येथे कारवाई करण्यात आली. त्यात देशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टाटा एस झिप मिनी टेम्पो (क्र. एम. एच. ५०, ६५१८) गाडीसह ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ६९६ बाटल्या असा एकूण सुमारे ३ लाख ३४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यावेळी दुडाप्पा चंद्राम नाटेकर कोळी (वय ६१, रा. शनिवार पेठ, सुमंगलनगर कराड), नंदकुमार विलास कदम (वय २४, रा. वाघेरी ता. कराड) यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. बेकायदेशीर दारू वाहतूक किंवा विक्री होत असल्यास अवैध मद्य विक्री धंद्यावर तसेच अवैद्य मद्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यास त्यावर छापे घालण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा किंवा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड, दुय्यम निरीक्षक शुल्क कराड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.