05 March 2021

News Flash

सुपारी तस्करी प्रकरण : सुपारीचे नमुने तपासण्याचे आदेश

नागपुरातून पाठवण्यात आलेल्या सुपारीच्या नमुन्याचे परीक्षण करण्यात आले नाही.

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने पाठवलेल्या सुपारीचे नमुने तपासून ती खाण्यायोग्य आहे किंवा नाही, हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय अन्न दर्जा व सुरक्षा विभागाला (एफएसएसएआय) दिले आहेत.

विदेशातून सुपारी आयात करण्यासाठी १०३ टक्के सीमा शुल्क भरावे लागते. मात्र, नागपुरातील व्यापारी काही कस्टम अधिकाऱ्यांना हाताशी धरून इंडोनेशिया आणि नायजेरियातून सुपारीची अवैध तस्करी करतात. यामुळे सरकारला दरवर्षी १५ हजार कोटींचा फटका बसतो. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा आशयाचे वृत्त लोकसत्ताने अनेकदा प्रकाशित केले. त्या वृत्ताची दखल घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभाग व डीआरआयने कारवाई केली. दरम्यान, मेहबूब चिमथानवाला यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून सुपारीची तस्करी रोखण्यात यावी, अशी विनंती केली.

या प्रकरणात डीआरआयने प्रतिज्ञापत्र दाखल करून इंडोनेशियातून श्रीलंकामार्गे भारतात सुपारीची तस्करी करण्यात येत असल्याकडे लक्ष वेधत या प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे (डीआरआय) अनेक प्रकरणांचा तपास करण्यात येत आहे व आतापर्यंत ४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींनाही अटक करण्यात आली, अशी माहिती दिली होती.

न्यायालयाने डीआरआय व अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईतील सुपारीचे नमुने तपासण्याचे आदेश एफएसएसएआयला दिले होते. त्यानंतर एफएसएसएआयने प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबईतील नाव्हा शेव्हा बंदरात करण्यात आलेल्या कारवाईतील नमुने तपासल्याचे सांगितले. मात्र, नागपुरातून पाठवण्यात आलेल्या सुपारीच्या नमुन्याचे परीक्षण करण्यात आले नाही. शिवाय ती सुपारी खाण्यायोग्य आहे किंवा नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे आज बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांनी नागपुरातून पाठवण्यात आलेल्या सुपारीचे नमुने तपासून ती खाण्यायोग्य आहे किंवा नाही, हे स्पष्ट करण्याचे आदेश एफएसएसएआयला दिले. यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. आनंद परचुरे, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. सौरभ चौधरी आणि अन्न सुरक्षा विभागातर्फे अ‍ॅड. रोहन मालविया यांनी बाजू मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 3:38 am

Web Title: illegal betelnut trade nagpur bench order to check betel nut samples
Next Stories
1 शासकीय रुग्णालयांना संपाची झळ
2 नागपूरकर यंदाही  ‘एअर शो’ला मुकणार?
3 जातीवंत कला टिकवण्यासाठी मूर्तीकारांची धडपड
Just Now!
X