28 February 2021

News Flash

धडक कारवाईने भूमाफियांना हादरा

बोईसरमध्ये प्रस्थापितांची बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

बोईसरमध्ये प्रस्थापितांची बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

पालघर/ बोईसर : बोईसरमधील काही निवडक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा देखावा काही महसूल कर्मचारी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी येथील काही प्रस्थापित भूमाफियांच्या अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भूमाफियांना हादरा बसला आहे.

शुक्ला कंपाऊंड परिसरातील शासकीय जागेवर नव्याने एका उभ्या राहू पाहणाऱ्या इमारतीवर संबंधित तलाठय़ाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालघरच्या तहसीलदार सुनील शिंदे यांनी जमीनदोस्त केलेल्या अतिक्रमणाच्या शेजारी २-३ नव्याने उभ्या अतिक्रमण विरुद्ध कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सोबत असलेल्या बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तलाठी सुशील चुरी यांना या दोन इमारतीच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे त्याच परिसरात असणाऱ्या एका टिंबर मार्केटमधील नव्याने उभी राहत असलेली इमारत जमीनदोस्त केली.

गेल्या काही वर्षांंपूर्वी अतिक्रमण केलेल्या भंगार गल्लीमधील काही बांधकामे पुन्हा उभा राहिल्याची माहिती मिळताच तेथील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी पथकाने मोर्चा वळविला. दोन जेसीबीच्या साह्यने तीन-चार इमारतींचे बांधकाम तसेच काही दुकानांविरुद्ध तडकाफडकी कारवाई केल्याने राजकीय वरदहस्त असणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले. अचानक केलेल्या कारवाईमुळे त्यादरम्यान अडथळा निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न झाला नाही. तसेच बोईसर पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त तात्काळ पुरवला गेल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई काही तासातच पूर्ण करण्यात आली.

बोईसर परिसरात शेकडो बेकायदेशीर इमारती असून त्यांना संबंधित तलाठी व कोतवाल यांचा वरदहस्त असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे नव्याने उभारली जात असताना याकडे महसूल कर्मचाऱ्यांकडून सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जातो तर आर्थिक हितसंबंध न जपणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारून कारवाई करण्यात येते असेही तहसीलदार यांच्या निदर्शनास आले.

गुन्हा दाखल करणार

जमीनदोस्त केलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्याला इमारतीच्या मालकाने दिशाभूल करून तीन ते सहा लाख रुपये उकळले असल्याचे  सांगितले. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी  सांगितले.  त्याच प्रमाणे या कारवाईदरम्यान आडकाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यतींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

अतिक्रमण क्षेत्राचा आढावा 

पालघर तालुक्यातील शासकीय व आदिवासी जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची तसेच नवीन शर्थीच्या जमिनीवर किंवा विनापरवाना वाढीव बांधकाम केलेल्या क्षेत्राचे आढावा घेण्यासाठी सर्व तलाठय़ांची बैठक पालघर तहसील कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे तसेच अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी कृती आराखडा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:59 am

Web Title: illegal construction of landlords in boisar demolished zws 70
Next Stories
1 नाका कामगार अडचणीत
2 तारापूरमधील प्रदूषणकारी कारखाना बंद
3 महाबळेश्वरमध्ये काळय़ा गव्हाची पेरणी!
Just Now!
X