परभणी रेल्वे स्थानकासमोरील न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण सोमवारी जमीनदोस्त करण्यात आले. यापूर्वीही अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली, पण त्यावेळी ही कारवाई पूर्ण झाली नव्हती. या वेळी प्रचंड बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून या जागेवरील ही अतिक्रमणे येथे होती.
रेल्वे स्थानकासमोर जिल्हा न्यायालयाच्या मोकळ्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल, टपरीधारकांनी अतिक्रमण केले होते. न्यायालयात जाण्यासाठी असलेला जुना रस्ता पूर्णपणे अतिक्रमणाने बंद झाला होता. रस्त्यावर अतिक्रमणाने विळखा घातल्याने न्यायालय व रेल्वेस्थानक परिसरात रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. महिनाभरापूर्वी न्यायालयाने महापालिकेला हे सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश बजावले. महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली, पण राजकीय विरोधाला महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला सामोरे जावे लागले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाले.
न्यायालयाने शनिवारी महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांना हा रस्ता सोमवारी सायंकाळपर्यंत मोकळा करण्याचे आदेश बजावले. कोणत्याही स्थितीत या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त व्हावीत, अशी न्यायालयाची तंबी असल्याने सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मोठय़ा बंदोबस्तात महापालिकेचे पथक येथे दाखल झाले. पथकाने अतिक्रमण काढण्यासाठी थेट जेसीबी लावली. त्यामुळे अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली. अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेशच असल्याने पथकाने कोणाचाही मुलाहिजा न करता सर्व अतिक्रमणे जेसीबीने काढून सामानासह टिप्परमध्ये भरले. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपऱ्या व हॉटेल्स, तसेच अन्य काही व्यावसायिकांनी या ठिकाणी पक्की बांधकामे केली होती. तीही मोहिमेत साफ करण्यात आली. या कारवाईमुळे सायंकाळी रेल्वे स्थानकापासून न्यायालयात जाणारा रस्ता मोकळा झाला.
या भागात न्यायालयाच्या जागेत असलेल्या आणखी एका हॉटेलचा करारनामा संपुष्टात येऊनही जागा रिकामी केली नसल्याने त्यांनाही न्यायालयाने नोटीस दिल्याचे समजते. रेल्वेस्थानक परिसरात कुंजबिहारी हॉटेललगत असलेली अतिक्रमणेही काढण्यात आली. या परिसरातील २७ दुकानांची बांधकामे जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली. यात आठ पानटपऱ्याही होत्या. पोलीस उपअधीक्षक प्रणय अशोक यांच्या नियंत्रणाखाली दंगानियंत्रण  पथक व पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त होता. मनपाचे उपायुक्त दीपक पुजारी, रणजित पाटील यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.