अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्यास चुकीचा पायंडा पडेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच जाहीर केले. मात्र रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यांवर सागरी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) सर्रास अनधिकृत बंगले उभारण्यात आले आहेत. नगररचना विभाग, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायतींमधील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ही बांधकामे सुरू असून, यामध्ये मोठमोठय़ा उद्योगपतींच्या बंगल्यांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई-ठाण्यापासून जवळ असल्याने रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुडचे सागर किनारे नामांकित व्यक्तींसाठी अत्यंत सोयीचे ठरत आहेत. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांजवळील जमिनी विकत घेऊन त्यावर आलिशान ‘महाल’ बांधण्याचा सपाटाच उद्योगपतींनी लावला आहे, तर फार्म हाऊसच्या नावाखाली काही हजार चौरस फूट भूखंडावर तीन ते चार मजली बांधकाम करण्यात आली आहे. यासाठी सीआरझेड कायदा थेट धाब्यावर बसवण्यात आला आहे.
सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अलिबाग तालुक्यात १३३, तर मुरुड तालुक्यात ११५ अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे उघड होत आहे. यापैकी सुमारे १८ बांधकामांप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यातील बडय़ा उद्योजकांच्या अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या बांधकामावर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. नुसत्या नोटिसा द्यायच्या, वेळ पडलीच तर एफआरआय दाखल करायचा पण कारवाई करायची नाही, हा नियम सर्व अधिकाऱ्यांनी पाळला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई का होत आहे, याबाबत कुठली माहिती देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार दिला जातो आहे.*याशिवाय गोविंद राजलू नायडू, जमशेद कामा यांच्या थळ येथील, दीपक निरव मोदी यांच्या किहीम येथील, ऋ षी कमलेश अगरवाल यांच्या धोकवडे येथील, करुणा अभिजीत राजन आणि अविनाश हíनश कोठारी यांच्या कोळगाव येथील अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. मुकुल मुरली देवरा (नांदगाव), शाहिद उस्मान बल्वा (दांडे तर्फे नांदगाव), शापुरजी पालनजी मिस्त्री (काशिद) यांनीही अनधिकृत बांधकामे केल्याची नोंद आहे.
पालकमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
अलीकडेच झालेल्या रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या बठकीत अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेला आला. स्थानिक राजकारण्यांच्या पाठबळाशिवाय अशी बांधकामे होऊ शकत नाहीत, ही बाबही यावेळी समोर आली. त्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि कारवाईत हस्तक्षेप केला तर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिले.

“अलिबाग आणि मुरुड तालुक्यात सीआरझेड क्षेत्रात येणाऱ्या तसेच सीआरझेड क्षेत्र वगळून इतर भागात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात गुन्हे दाखल करून त्यानंतर ती पाडण्याची कारवाई सुरू केली जाईल. खारफुटीची कत्तल करून भराव करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे.”
सुमंत भांगे, रायगडचे जिल्हाधिकारी