News Flash

सावंतवाडीत अवैध उत्खनन करणाऱ्यांवर १ कोटी २० लाखांचा दंड

७५ जणांना १ कोटी २० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यात अवैध उत्खनन करणाऱ्या ७५ जणांना १ कोटी २० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे हा दंड वसुलीसाठी तहसीलदार कार्यालयाने पावले टाकली नाहीत. मात्र काही प्रकरणात दंड भरण्यास नकार देणाऱ्या जमिनी महसूल खात्याच्या नावे करण्यास पावले टाकण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यात काळा दगड, चिरे, वाळू, माती उत्खनन बिनापरवाना करण्यात आलेली आहे, तसेच काही प्रकरणात परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करण्यात आलेले आहे, अशा सुमारे ७५ प्रकरणात २०१३ पासून वसुलीसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाने पावले टाकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालुक्यात १ कोटी १८ लाख ९१ हजार ६३१ रुपये महसूल वसुली रखडली आहे. या ७५ जणांना रीतसर दंडाची नोटीस बजावण्यात आली, पण २०१३ पासून वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या वसुलीकडे दुर्लक्ष करत त्यांना पुन्हा उत्खननाचे परवानेदेखील देण्यात आले. या अर्थपूर्ण व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोलगावमध्ये माती उत्खननाबाबत १० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यावर अपीलही झाले, पण नंतर दंडात्मक कारवाईबाबत काय निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी कशासाठी करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

डिंगणे दशक्रोशीत सुमारे आठ ते दहा जणांनी चिरा उत्खनन केले. या अवैध चिरा खाणीला सुमारे सोळा लाख रुपयांचा दंड करण्यात आला, पण हा दंड वसुलीचे नाव नाही. महसूल विभाग गप्प कशासाठी राहिला असा प्रश्न विचारला जात आहे. अवैध चिरे खाणीवर तक्रार होईपर्यंत महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वेत्ये, मळगाव, तळवणे, मळेवाड, साटेली, सातार्डा भागात चिरे खाणीना परवानगी देण्यात आली आहे. माडखोल दशक्रोशीत इको सेन्सिटिव्ह  झोनमुळे काळा दगड खाणी बंद आहेत. जेथे परवानगी देण्यात आली नाही तेथे अवैध उत्खनन सुरू आहे. त्याची दखल महसूल विभाग घेत नाही, तसेच भरारी पथके फक्त कागदोपत्रीच आहेत असे सांगण्यात येते.

काळा दगड, चिरा, वाळू अवैध प्रमाणात गोवा राज्यात जात आहे, तसेच अवैध स्वरूपात उत्खनन सुरू असूनही महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे शेतकरी वर्गातून आरोप करण्यात येत आहे. वनसंज्ञा, इकोसेन्सिटिव्ह या विषयात सर्वसामान्यांना त्रास आणि अवैध धंदे करणाऱ्यांना साथ देण्याचा प्रकार महसूलकडून होत असल्याचे सांगण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 12:47 am

Web Title: illegal excavation in sawantwadi
Next Stories
1 मुलांच्या मनातील कुतूहलाची भावना दाबू नका; ‘संवादी पालकत्व’ कार्यशाळेतील सूर
2 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तिसरा
3 पतंगबाजी : आता सडकी, तेव्हा ?
Just Now!
X