मंगळवेढा येथील काँग्रेसचे नेते तथा संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी काळुंगे गुरूजी यांच्या शेतातील विहिरीमधून सुमारे १५ लाख रूपये किंमतीची स्फोटके पोलिसांनी जप्त केली. ही स्फोटके बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आली होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या कारवाईत १६३ जिलेटिन कांड्या व पाच इलेक्ट्रॉनिक्स डिटोनेटर याप्रमाणे अवैध स्फोटकांचा साठा सापडला. या स्फोटकांचा वापर विहीर खोदकामासाठी केला जात होता.
मंगळवेढा शहरालगतच काळुंगे गुरूजी यांची शेती आहे. या शेतात स्फोटकांचा वापर करून विहिरीचे खोदकाम केले जात असताना पोलिसांनी तेथे धाड टाकली. स्फोटकांचा वापर करण्यासाठी उपयोगात आणलेले दोन ब्लािस्टग ट्रॅक्टरही आढळून आले. याप्रकरणी नवनाथ भीमशा पुजारी (३२, रा. सोरडी, ता. जत, जि. सांगली) व सोमनाथ अर्जुन पवार (३६, रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.