अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने खाद्य पदार्थाची शुध्दता तपासण्यासाठी गेल्या वर्षी वेगवेगळया ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत विना परवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न विक्री संस्थांकडून ६० लाख, ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खाद्य पदाथार्ंची शुध्दता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. अनेकदा पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार बरेच अन्न निर्माते व विक्री संस्थांकडून होतो. यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग खाद्य पदाथार्ंची शुध्दता तपासत असते. नागरिकांच्या भेसळ संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास वा विभागाला शंका आल्यास स्वतहून खाद्य पदार्थाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जातात.
विक्री परवाना नसताना विविध खाद्य पदार्थाची दुकाने थाटलेली दिसतात. अशा बिगर परवाना दुकानांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. जिल्ह्य़ात अशा परवाना नसलेल्या आणि कायद्याच्या उल्लंघन करीत असलेल्या संस्थांवर मोठय़ा प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.