ढाब्यांमध्ये चोरीच्या मालाची राजरोस विक्री; ढाब्यांसाठी मार्गानजीक बेकायदा माती भराव

चिल्हार-बोईसर मार्गावर असलेल्या ढाब्यातून अनधिकृत धंदे राजरोसपणे सुरू असून या ढाब्यांमध्ये चोरीच्या मालाची खरेदी-विक्री जोरात चालत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील बहुतांश ढाबे हे आदिवासींच्या जमिनींवर उभारण्यात आले आहेत. परप्रांतीयांकडून या जमिनींवर बेकायदा माती भराव करून अनधिकृत ढाबे आणि गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.

या ढाब्यांच्या आवारात रात्रीच्या वेळेस बेकायदा मद्य विक्री, डिझेल चोरी आणि चोरीचा माल विक्री सारखे अनधिकृत धंदे खुलेआम सुरू आहेत. विविध ठिकाणाहून आलेली माल वाहतूक अवजड वाहने रात्रीच्या वेळेस या ढाब्यांसमोर भररस्त्यात उभी केली जात असल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे ढाबा व गाळे यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. महामार्गापासून चिल्हार बोईसर रस्त्यावरील चिल्हार फाटय़ापासून नागझरीपर्यंत रस्त्यालगत बहुतांश जमिनी या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही भूमाफिया बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत व विविध प्रलोभने दाखवत या जमिनी त्यांच्यामार्फत विकत घेतल्या जात आहेत. या जमिनी आदिवासींना शासनाकडून मिळालेल्या आहेत. अशा जमिनी फक्त कसण्याच्या किंवा कृषी वापरायोग्य वापरणे अपेक्षित असताना बेकायदेशीररीत्या मातीचा भराव करून त्यावर अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.

यात ढाब्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. याच ढाब्यातून बेकायदा मद्य खरेदी-विक्री, डिझेल खरेदी-विक्री, गांजा आदी अमली व प्रतिबंध असलेले पदार्थ विक्री केली जात असल्याने काही ढाबे अनधिकृत धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत असे समजते. यामुळे या भागातील सामाजिक वातावरणही बिघडत आहे असे काहींचे म्हणणे आहे.

वर्षभरापूर्वी चिल्हार फाटय़ानजीक केमिकलच्या ड्रमचा मोठा साठा गुन्हे शाखेने जप्त केला होता. याच रस्त्यावर अलीकडे गुंदले गावच्या हद्दीतील अनधिकृत गाळ्यांमधील फर्निचरच्या दुकानांना आग लागली होती. ढाबाचालक कायद्याला वेठीस धरून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यवसाय करीत आहेत. काहींच्या मते महसूल व वन प्रशासन आर्थिक फायद्यापोटी या भूमाफियांना पाठीशी घालत आहे.

बेकायदा धंदा असा..

ढाब्यांवर अवजड वाहनचालक वाहनांचे डिझेल काढून ते कमी किमतीत ढाबे मालकांना विकतात. हे ढाबे मालक आपल्या ओळखीच्या लोकांना हे डिझेल बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करीत आहेत. याचबरोबरीने परराज्यातील दमण बनावटीची दारूची विक्री करणे, गांजासारखे अमली व प्रतिबंधित अमली पदार्थ विक्री करणे, भंगाराच्या लोखंडी सळ्या, ऑइल आणि एलपीजी गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी असे प्रकार रात्रभर या ढाब्यांवर सुरू असतात,  अशी माहिती समजते. ढाबाचालक कायद्याला वेठीस धरून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यवसाय करीत आहेत.