जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजूषा गुंड यांचे पती राजेंद्र गुंड अधिकाऱ्यांना दमबाजी करत शिक्षण विभागात बेकायदा हस्तक्षेप करत असल्याची जोरदार हरकत शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आली. या हस्तक्षेपासंदर्भात अध्यक्षांवर जिल्हा परिषद अधिनियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी समितीचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करणार आहेत.
समितीचे सदस्य प्रवीण घुले व संभाजी दहातोंडे यांनी ही हरकत घेतली. समितीची सभा जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या अनुपस्थितीमुळे दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात सदस्यांनी गुंड यांच्या हस्तक्षेपाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी समितीच्या सभेतच केली.
कर्जत तालुक्यातील घुमरी येथील सीना ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची गुरुदत्त विद्यालय ही माध्यमिक शाळा चोरीला (स्थलांतरित झाली) गेल्याची तक्रार पोलिसांकडे जानेवारीत दाखल करण्यात आली आहे. तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले आहे. परीक्षा कोण घेणार, गेली चार महिने त्यावर काय कार्यवाही केली, अशी विचारणा घुले यांनी केली. त्यावर माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी सांगितले, की यासंदर्भात मला अध्यक्षांचा दूरध्वनी आला होता. त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावले, परंतु प्रत्यक्षात अध्यक्षांचे पती तेथे होते. त्यांनी मला शाळा, संस्थेवरील कारवाई थांबवण्यास सांगितले. परंतु आपण नियमानुसार कार्यवाही केली जाईल, कारवाईचे अधिकार मला नाहीत. उपसंचालकांना अहवाल पाठवला आहे, असे उत्तर दिल्याची माहिती दिली.
अध्यक्षांचे पती राजेंद्र गुंड हे बेकायदा हस्तक्षेप करत आहेत, अधिकाऱ्यांना दमबाजी करत आहेत. त्यांच्यावर जि.प. अधिनियमानुसार कारवाई करण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करू व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रार करू, असे घुले व दहातोंडे यांनी सांगितले.
यंदापासून बालसंस्कार वर्ग
शिक्षण विभाग यंदापासून प्राथमिक शाळांमध्ये बालसंस्कार वर्ग सुरू करणार आहे. ते दि. २० एप्रिल ते १० मे दरम्यान भरणार आहेत. संस्कार वर्गात विविध स्पर्धा, संस्कार गोष्टी, पोहणे व खेळांचे प्रशिक्षण, सूर्यनमस्कार राबवले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सभेत दिली. प्राथमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवणाऱ्या खडकी (नगर), माळवाडी (पाथर्डी), भोरमाळ (श्रीगोंदे), दळवीवस्ती व गटेवाडी (पारनेर) या शाळांचे अभिनंदन करण्यात आले. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली, त्यात शाळांची गुणवत्ता वाढल्याचे निदर्शनास आले, अ श्रेणीत १७५ तर ब श्रेणीत सुमारे २ हजार ४०० शाळा आल्याची माहिती कडूस यांनी दिली.