– धवल कुलकर्णी

काळा बाजार करणाऱ्यांकडून मद्य मिळवणाऱ्या तळीरामांवर आणि त्यांना ती देणाऱ्या अवैध मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून या विभागाने बाराशेच्या वर गुन्हे नोंद करून जवळजवळ तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणारी सर्व दुकाने बंद आहेत.

शुक्रवार पर्यंत राज्यात एकूण १,२२१ गुन्हे नोंदवण्यात आले असून एकूण रु. २,८२,३१,१०२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे. तसेच ३६ वाहने जप्त केली असून ४७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येऊ नये यासाठी १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत, अशी माहिती खात्याचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये उत्पादन शुल्क हे शेजारील राज्यांपेक्षा अधिक असल्यामुळे गोवा दमण आदी ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये मद्याची तस्करी केली जाते. शेजारील गुजरात मध्ये दारूबंदी असल्यामुळे मध्यप्रदेश सारख्या राज्यांतून गुजरातमध्ये मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जाते.