राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतरही दारूची अवैध विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एप्रिल या एकाच महिन्यात ३५ लाखापेक्षा जास्त देशीविदेशी दारूसह ५०० आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत या अवैध दारूच्या प्रकरणात पोलिसांनी ३०० गुन्हे दाखल केले असून यात पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी श्रमिक एल्गारच्या वतीने मोठय़ा संख्येने जनआंदोलन केले, याचे फलित म्हणजे जिल्ह्यात दारूबंदी झाली. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारू बंद झाली हे खरे असले तरी अवैधरित्या दारू विकली व खरेदी केली जात आहे, हेही तितकेच सत्य आहे. इतर जिल्ह्यातून या जिल्ह्यात दारू येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज झाले आहे. यासाठी पोलिसांनी अवैध दारू रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट स्थापन केले आहे व दारूच्या विक्रीची अथवा खरेदी करणाऱ्यांची सूचना देण्यासाठी पोलीस दल व जिल्हा प्रशासनाने टोल फी क्रमांक जाहीर केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे आतापर्यंत पोलिसांनी अनेक छापे मारून दारू जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे छापासत्र अद्यापही सुरूच आहे. या एका महिन्यात देशीविदेशी व मोहाची दारू व अन्य मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात आले आहे. यात दुर्गापूर, रामनगर, चंद्रपूर, घुग्घूस, महाकुर्ला, बल्लारपूर, राजूरा, गडचांदुर, वरोरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी, पोंभूर्णा, भद्रावती, चिमूर, सावली, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, टेकामांडवा, विरूर या पोलीस ठाण्याअंतर्गत छापेमारी करण्यात आली आहे. यात मोठय़ा प्रामाणात देशीविदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
येथील तळीरामांना दारू मिळत नसल्यामुळे ते इतर जिल्ह्यात जाऊन दारू पिण्यात मग्न आहेत, तर काहींनी दारू घरपोच मिळावी म्हणून नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. यात घरपोच दारू मिळावी म्हणून कुरिअरचा वापर करण्यात येत आहे. काहींनी इतर जिल्ह्यात नातेवाइकांना भेटण्याचा बहाणा करून दारू पिण्यासाठी जाण्याचा तडाका सुरू केला आहे, तर काहींनी फक्त दारू पिण्यासाठी नागपूर, भंडारा, यवतमाळ जिल्ह्याचा आश्रय घेतला आहे.
दुसरीकडे अवैध दारूचा हा गोरखधंदा जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात सुरू असून पोलीस दलानेही चौकशीचे सत्र सुरू केले आहे. आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून यापुढे किती अवैध दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.