28 January 2020

News Flash

अवैध वाळू व्यवसाय; दोनशेंवर व्यक्तींविरुद्ध गुन्हे

अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक करण्याच्या कारणावरून जवळपास शंभर व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पंधरा दिवसांतील कारवाई

जालना : अवैध वाळू उपसा, साठा, वाहतूक आणि सहकार्य करण्याच्या आरोपावरून अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी वेगवेगळ्या दोन तक्रारींवरून दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. अवैध वाळू व्यवसाय करणारांना साठे करण्यासाठी शेतजमीन देणे, त्याचप्रमाणे वाळू वाहतुकीच्या वाहनांना शेतातून रस्ता देण्याच्या कारणावरून कांही शेतक ऱ्यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

महसूल मंडल अधिकारी एकनाथ सोनवणे यांच्या तक्रारीवरून अंबड तालुक्यातील गोरी आणि गंधारी गावातील गोदावरी नदीच्या पात्रातून चारशे ते पाचशे ब्रास अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक करण्याच्या कारणावरून जवळपास शंभर व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महसूल मंडल अधिकारी श्रीपाद मोताळे यांनी अंबड तालुक्यातील कुरण आणि पाथरवाला (बु.) गावातील अवैध वाळू व्यवसायाच्या संदर्भात शंभर ते सव्वाशे व्यक्तींविरुद्ध गोंदी पोलिसांत तक्रार दिली आहे. वाहनांचे मालक, मजूर त्याचप्रमाणे वाळू साठय़ांसाठी आणि वाहनांना शेतजमिनीतून रस्ते देणाऱ्या शेतक ऱ्यांच्या नावेही या तक्रारी आहेत. वाळू चोरीसह गौण खनिज उत्खनन अधिनियम, नैसर्गिक साधनसंपत्ती अधिनियम, त्याचप्रमाणे पर्यावरण अधिनियमाचा भंग केल्याच्या आरोपावरून ही तक्रार करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसातील या दोन्ही तक्रारी आहेत.

अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, शहागड, पाथरवाला गावातील गोदावरी नदीच्या पात्रातील अवैध वाळू व्यवसायाच्या संदर्भात उपविभागीय महसूल अधिकारी शशिकांत हदगल यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अलीकडे अहवाल दिला होता आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते.

त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ पथकाने आपेगाव, कोठाळा, गोंदी आदी ठिकाणी केलेल्या तपासणीत वाळू व्यवसायाच्या संदर्भात चुकीच्या व अवैध बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अंबड येथील तहसीलदार मनीषा मेने यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली. वाळू व्यवसाय आणि अन्य कांही बाबतीत तहसीलदार मेने यांनी कर्तव्य परायणता राखली नसल्याचे जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरून निष्पन्न होत असल्याचे यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे.

आठ महिन्यांत ४९ गुन्हे नोंद

गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात अवैध वाळू व्यवसायाच्या संदर्भात जालना जिल्ह्य़ात ४९ गुन्हे पोलिसांनी नोंदविले असून वाळू वाहतूक करणारी ७३ वाहने जप्त केली आहेत. यासंदर्भात संबंधित शासकीय यंत्रणेने १४४ जणांविरुद्ध ३ कोटी २३ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली असून त्यापैकी ५८ लाख ७५ हजार रुपये दंडाची वसुली झालेली आहे. यापैकी सर्वाधिक १ कोटी ९६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई अंबड तालुक्यातील आहे. अवैध वाळूच्या संदर्भात यापूर्वी एका तहसीलदारावर निलंबन कारवाई करण्यात आली होती, तर एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

First Published on December 11, 2019 1:09 am

Web Title: illegal sand business offenses against two hundred persons zws 70
Next Stories
1 महाविद्यालयाच्या फलकावर प्राध्यापकांच्या वेतनाचे आकडे
2 नांदेडमध्ये फोन न उचलण्यावरून गोळीबार
3 . तर अनेक लहान शाळांवर गंडांतर!
Just Now!
X