बेकायदा वाळू उत्खननामुळे झाडांच्या मुळांना धोका, घरेही असुरक्षित

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्यातील किनारे परिसरातील अपरिमित वाळू उत्खनन व वातावरणीय बदलांमुळे समुद्रकिनारे खचू लागले आहेत.  समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याने किनाऱ्यावर असलेली गर्द हिरवळीची झाडे उन्मळून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचबरोबरीने किनारपट्टीवरील घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

पालघर जिल्ह्याला झाई ते नायगावपर्यंतचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. हे समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. जिल्ह्यातील अर्नाळा, वसई, केळवा, शिरगाव, डहाणू आणि बोर्डी हे किनारे बाराही महिने पर्यटकांनी बहरलेले असतात. मात्र आता हे किनारे भकास होऊ  लागल्याने येथे पर्यटकांचा ओघ ओसरत चालला असल्याचे दिसते. समुद्रकिनाऱ्यांची धूप होत असल्याने येथील हरित संपदा हळूहळू नष्ट होऊ  लागली आहे. पर्यावरणप्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील डहाणू तालुक्यापासून वसई तालुक्यापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर छुप्या मार्गाने समुद्रकिनाऱ्याच्या वाळूचा उपसा वाळूमाफियांमार्फत मोठय़ा प्रमाणात होत आहे. या वाळूउपशामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडत आहेत. भरतीच्या वेळी हे खड्डे आपोआप बुजले जातात. मात्र या नैसर्गिक प्रक्रियेत भरतीचे पाणी परतत असताना समुद्रकिनाऱ्याच्या तटावरील वाळू प्रवाहसोबत येऊन किनारे खचतच चालले आहेत.

अलीकडे सरकारच्या निर्मल सागर तट अभियानांतर्गत सागरी धूप थांबावी यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगतच्या ग्रामपंचायतींना निधी वितरित केला होता. मात्र, काही ग्रामपंचायतींनी बंधाऱ्याचे कामच सुरू केले नसल्याचे दिसते. तर ज्या ठिकाणी बंधारे बांधले आहेत. त्या बंधाऱ्याला वाळूमाफियांनी भगदाडे पडून तेथून वाळू तस्करी सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहेत. महसूल, पोलीस प्रशासन यांचा या वाळूमाफियांवर अंकु श नसल्याने राजरोसपणे शेकडो ब्रास वाळू विविध समुद्रकिनाऱ्यांवरून उत्खनन होत आहे.

शोधू कुठे किनारा?

* किनाऱ्याची धूप होत असताना समुद्रकिनारपट्टीवरील गावांना समुद्राच्या पाण्याच्या मोठा धोका उद्भवत आहे. गेल्या काही वर्षांत दहा ते पंधरा मीटर समुद्र पातळी वाढल्याने तेवढीच धूपही झाली आहे. ज्या घरांना समुद्राचे पाणी लागत नव्हते त्या घरांमध्ये आता समुद्राचे पाणी शिरून नुकसान होत असल्याच्या घटना पालघर, डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी घडल्या आहेत.

* नैसर्गिक आपत्तींमुळेही समुद्रकिनाऱ्यावरील हरित संपदा नष्ट होत असल्याचे दिसत आहे. केळवे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पूर्ण सुरूबाग उद्ध्वस्त झाली होती. डहाणूसह अर्नाळा किनाऱ्यावरही अशी झाडे या कारणामुळे उन्मळून पडली आहेत.

* गेल्या पाच ते सहा वर्षांपासून किनाऱ्यांची धूप होण्याचे प्रमाण वाढतच आहे. किनाऱ्यांची धूप होताना किनाऱ्यावर असलेली शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत. किनाऱ्यालगत सुरूच्या झाडांची संख्या मोठी आहे. मात्र आता ती उन्मळून पडत असल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे.

जागतिक तापमानवाढीसह वाढत जाणारे आधुनिकीकरण तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील बेसुमार वाळू उत्खनन यामुळे गेल्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यांची मोठी धूप होत आहे. त्यामुळे किनाऱ्यांवरील हरित संपदेसह गावे भविष्यात धोक्यात येणार आहेत.

– कुंदन राऊत, पर्यावरणवादी कार्यकर्ता