रायगड जिल्ह्य़ात अवैध रेती उत्खननाला ऊत आल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी घेतली असून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत रेवदंडा आणि गोरेगाव इथे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, तर १० जणांना अटक करण्यात आली आहे.  रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, रोहा, मुरुड, पेण, श्रीवर्धन, माणगाव आणि महाड तालुक्यांत अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ९ जानेवारीच्या अंकात दिले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी गंभीर दखल घेतली असून आता जिल्ह्य़ातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांना अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर आतापर्यंत झालेल्या कारवाईत रेवदंडा आणि गोरेगाव इथे अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. यात रेवदंडा इथे १८० ब्रास, तर गोरेगाव इथे ११० ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली आहे. अवैध रेती उत्खनन केल्याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.     राज्यात सक्शन पंपने रेती उत्खनन करण्यास बंदी असली तरी रायगड जिल्ह्य़ात भोनंग, रेवदंडा, धरमतर, मांदाड, सावित्री आणि आंबेत खाडीत सक्शन पंपाच्या साह्य़ाने अवैध रेती उत्खनन सुरू आहे. रेती लिलाव पर्यावरण विभागाच्या जाचक अटींमुळे होऊ न शकल्याने अवैध रेती उत्खनन मोठय़ा प्रमाणात सुरू झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन येणाऱ्या काळात अधिक व्यापक स्वरूपात कारवाई केली जाणार असल्याचे जावळे यांनी सांगितले आहे.