पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या (दि.१७) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार, राज्यातही बंद पुकारला जाणार असल्याने उद्या (सोमवार) अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी सर्व राज्यांना डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायीकांचे कोणत्याही हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी विशेष कायदा करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर रविवारी आयएमएने देशव्यापी संपाची घोषणा केली.

देशातील वैद्यकीय सेवेबाबतची सर्वोच्च संस्था असलेल्या आयएमएने डॉक्टरांवरील आणि हेल्थकेअर सेवेतील कर्मचाऱ्यांवरील मारहाणीबाबत केंद्रीय पातळीवर व्यापक कायदा करण्यात यावा अशी मागणी केली होती.

त्यानुसार, उद्याच्या संपावेळी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा इमर्जन्सी आणि कॅज्युलिटी सेवा वगळता रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर्स चोवीस तासांसाठी सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी ६ वाजेपर्यंत बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.