राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानं पूराचं पाणी ओसरत असून, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आज (२७ जुलै) आणि उद्या (२८ जुलै) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

२९ आणि ३० जुलैला रोजी ऑरेंज अलर्ट

पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार असून, २९ आणि ३० जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंट अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा अर्थ काय?

ग्रीन अलर्ट –

कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

यलो अलर्ट –

पुढील काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सूचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्टचा इशारा दिला जातो.

ऑरेंज अलर्ट –

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणं, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. पुढच्या संकटाच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने हा अलर्ट दिला जातो. गरज असेल आणि महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितलं जातं.

रेड अलर्ट –

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd forecast heavy rainfall imd issues yellow alert for raigad ratnagiri kolhapur pune satara sindhudurg bmh
First published on: 27-07-2021 at 08:42 IST