यापूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे सर्व विषय ऐकून घेत. आता माझ्यावर ही जबाबदारी आली आहे, ती मी स्वीकारत असून औरंगाबाद शहरात ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहे, अशा शब्दांत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडय़ाच्या नेतृत्वाची धुरा वाहण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. औरंगाबाद शहरात आयआयएम आणण्यास मी स्वत: पुढाकार घेतो व तुमचे काम मार्गी लावण्यास दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न करतो, अशी ग्वाहीही दानवे यांनी दिली.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) वतीने औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील उद्योजकांची बैठक मंगळवारी शहरात आयोजित केली होती, त्या वेळी दानवे बोलत होते. आयआयएम, पायाभूत सुविधा, रेल्वे, विमान, कार्गो हब, पासपोर्ट कार्यालय या विषयांवर उद्योजकांनी या वेळी विविध समस्या दानवे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर दानवे म्हणाले की, मी पहिल्यांदाच ‘सीएमआयए’मध्ये आलो आहे. नवी दिल्लीत येत्या ७ ऑगस्टला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत सीएमआयए पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीस आपणही उपस्थित राहणार आहोत. या बरोबरच मानवी साधनसंपत्ती विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही या विषयाचा आवर्जून पाठपुरावा करू. या विषयावर मराठवाडय़ातील सर्वच खासदार तुमच्या पाठीशी राहतील, यात शंका नाही. सीएमआयएचे कार्यालय दिल्लीतील माझ्या स्वीय साहायकांच्या कार्यालयास जोडण्यात येईल, असे आश्वासनही दानवे यांनी या वेळी दिले. केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
सीएमआयएचे अध्यक्ष मुनिष शर्मा यांनी स्वागत केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राम भोगले, सीएमआयएचे उपाध्यक्ष आशिष गर्दे उपस्थित होते. भोगले म्हणाले की, विदर्भात व पुण्यात केंद्र सरकारने मोठय़ा संस्था दिल्या. मात्र, मराठवाडय़ास काही दिले नाही. ‘आयआयएम’साठी मराठवाडय़ातील उद्योजकांनी फॅकल्टीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे, असेही त्यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई कॉरिडोर, कंटनेर डेपो, बुद्धिस्ट सर्किट जोडण्यासाठी एअर कनेक्टीव्हिटी या मुद्दय़ांवरही या वेळी चर्चा झाली.