उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

सोलापूर : सोलापुरात एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि पीडित मुलीला तत्काळ मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.

सोलापुरात विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ानुसार गेल्या सहा महिन्यांपासून पीडित दलित अल्पवयीन मुलीवर सर्व आरोपी सामूहिक लैंगिक अत्याचार करीत होते. राज्यात हिंगणघाट येथील पीडितेचे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात ही घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस खात्याने सर्व आरोपींना अटक करावी आणि तातडीने तपास करून नराधमांना कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने कर्तव्य पार पाडावे. अटक केल्यानंतर आरोपींना जामीन मिळणार नाही, याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांना घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. तसेच पीडित मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पीडित मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार संरक्षण द्यावे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

युवक काँग्रेसची मागणी

दरम्यान, सोलापुरातील या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी आणि जलदगतीने तपास करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करावे आणि आरोपींना फाशीची शिक्षा होण्याच्यादृष्टीने पोलीस तपास यंत्रणेने कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी सोलापूर शहर युवक काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. पोलिसांनी गांभीर्याने तपास करून सर्वच आरोपींना जेरबंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला आहे.