रायगड जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत .

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली . जिल्ह्यातील महाड , पोलादपूर , कर्जत , खालापूर , रोहा , श्रीवर्धन आदी तालुक्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखटासह जोरदार वादळी पाऊस झाला. यात आंबा , काजू आणि नारळी पोफळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं. तसेच शेतात कापून ठेवलेले उन्हाळी भात भिजले. प्राथमिक सर्वेक्षणानुसार जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाला याचा फटका बसला आहे.  वादळामुळे अनेक घरे, शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले, घरांचे छप्पर,  पत्रे उडून गेल, कौले फुटली, काही ठिकाणी भिंती कोसळल्याचे वृत्त आहे. विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता .

आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  उद्योग व्यवसाय बंद आहेत. मागणी नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला, फळभाज्या फेकून देण्याची वेळ आली.  त्यातच अवकाळी पावसामुळे मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आह. महिनाभरात ३ वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना रायगडकरांना करावा लागला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना भरपाईच्या माध्यमातून दिलासा मिळावा. या हेतूने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .