यंदाच्या गणेशोत्समवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे  अलिबागेमधील घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यायची तयारी नगरपालिकेने केली आहे. ‘आम्ही करू आपल्या बाप्पांचे विसर्जन’ असा उपक्रम  नगरपालिकेने हाती घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

यंदा मात्र करोनामुळे विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे. शिवाय मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच विसर्जन करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ , पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे , अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी , नगरसेवक महेश शिंदे यांनी अलिबाग चौपाटीवरील विसर्जन स्थळाची पाहणी केली. थेट भाविकांच्या  घरूनच गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणण्याची तयारी नगरपालिकेने ठेवली आहे. यासंदर्भात काही प्रभागातील भाविकांनी तयारी दाखवली आहे, असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.  विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना अलिबाग शहरातील टपाल कार्यालयाजवळ थांबवले जाईल. तेथून घरगुती गणेशमूर्तीसह दोन भाविक तर सार्वजनिक गणेशमूर्तीसोबत मंडळाच्या ५ सदस्यांना पुढे प्रवेश दिला जाईल . पुढे क्रीडाभुवन येथे गणेशमूर्ती ताब्यात घेतली जाईल व नगरपालिकेचे कर्मचारी मूर्तीचे विसर्जन करतील.