पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काल मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व हजाराच्या नोटा रद्दबातल ठरवल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बाजारपेठांमधील व्यवहार जवळपास ठप्प झाले असून, तांत्रिक मंदीचे चित्र उभे ठाकले आहे.

नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मतमतांतरे व्यक्त होत असून, पाचशे व हजारांच्या नोटा व्यवहारात न चालवण्याची सर्रास भूमिका व्यापाऱ्यांनीच घेतली आहे. तर, या मोठय़ा नोटा रद्दबातल झाल्याने हा आर्थिक फटकाच बसल्याची भावना सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सध्या बँकिंग व्यवहार दोन दिवस बंद ठेवून नव्या नोटा वितरित केल्या जाणार आहेत. असे असले तरी ज्यांच्याकडे पाचशे व हजारांच्या नोटा आहेत त्यांची दोन दिवसांसाठी तरी कोंडी झाली आहे. या नोटा केमिस्ट, सरकारी दवाखाने, पेट्रोलपंप अशा काही ठिकाणीच चालणार होत्या. परंतु, या ठिकाणी गतीने व्यवहार झाल्याने मोडीची मोठी टंचाई भासून येथीलही बहुतांशी व्यवहार ठप्प झाले.

टोलनाक्यांवर वाहनधारकांनी जाणीवपूर्वक पाचशे व हजारांची नोट बाहेर काढून सुट्टय़ा रकमेचे वांदे करून ठेवले. परिणामी सुट्टे पैसे नसल्याने वादाचे प्रसंग घडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अखेर विनाटोल वाहने सोडण्याची नामुष्की टोल ठेकेदारांवर आली. आणि विनाटोल प्रवासाचा आनंद मिळाल्याचे समाधान वाहनधारकांमधून व्यक्त झाले. विशेष म्हणजे व्यापारी वर्गानेच जणू अज्ञानातूनच या नोटा केवळ कागदी तुकडा राहिल्याची चर्चा केल्याने सर्वसामान्य व ग्रामीण जनता पुरती भेदरून गेली.

त्याचा परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. बँकांचे आर्थिक व्यवहार चालू होताच हजार, पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी संबंधित बँका व डाक कार्यालयात मोठी गर्दी उसळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या व ‘सोशल मीडिया’वरील चर्चेतून या नोटा बदलून मिळण्याची खात्रीही वर्तवली गेल्याने लोकांमध्ये काही प्रमाणात दिलासाजनक वातावरण निर्माण    झाले. आज दिवसभर नोटा हटल्याची आणि मोदींच्या आक्रमक भूमिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू होती. देशातील बनावट नोटा व भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होणे राष्ट्रहिताचे मानून मोदींच्या या भूमिकेचे मात्र सर्व थरातून स्वागत होत आहे.