उत्तर प्रदेशातील हाथरस  येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात असलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून या कृतीतून मोदी व योगी सरकार हे पूर्णपणे हुकूमशाही करत असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली असून उत्तर प्रदेशमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

येथील बस स्थानकासमोर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निदर्शन मोर्चात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे , निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे , नितीन अभंग , राजेश वाकचौरे, मजहर शेख, अजय फटांगरे, शैलेश कलंत्री, शेखर सोसे, मुस्ताक शेख, योगेश जाजू यासह विविध युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

सत्यजीत तांबे म्हणाले की, देशात मोदी व योगी सरकारच्या काळात लोकशाही पायदळी तुडवून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. भारतीय राज्यघटनेत सक्षम विरोधक हा लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचा ठरवला आहे. मात्र विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम मोदी सरकारकडून केले जात आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते खा. राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून याचा संपूर्ण भारतामधून निषेध व्यक्त होत आहे.