साखरेचे वाढलेले प्रचंड उत्पादन पाहता साखरेला जादा दर मिळणे कठीण आहे. त्यामुळे आता यापुढे साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यायला हवा. यासाठी किसन वीर कारखान्याने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कारखान्याचा गौरव केला.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. त्या भेटीत साखर उद्य्योगातील विविध सहप्रकल्प, दुष्काळी परिस्थिती आणि एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत भोसले यांनी दहा वर्षांपूर्वीच किसन वीर कारखान्याने ‘बी हेवी’ या ‘इथेनॉल’ निर्मितीच्या केलेल्या प्रयोगाबद्दल सांगितले.हा प्रयोग संपूर्ण देशातील पहिला प्रयोग होता.

हाच धागा पकडून गडकरी म्हणाले, की या प्रश्नाबाबत केंद्राने धोरण जाहीर केले आहे. मात्र तत्पूर्वीच तुम्ही काळाची पावले ओळखून ‘इथेनॉल’ उत्पादन सुरू केले, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. इंधनातील ‘इथेनॉल’ वापर वाढविल्याने आता याला जादा दर देणेही शक्य झाले आहे. नजीकच्या काळात ‘इथेनॉल’चा वापर अधिकाधिक वाढविला जाणार असून त्याचा लाभ ऊ स उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे होणार आहे.

इथेनॉलसोबतच अल्कोहोलकडे वळण्याचे आवाहन करताना गडकरी म्हणाले, की उसाच्या रसापासून अल्कोहोल निर्मितीचे प्रयोगही अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. साखरेऐवजी आता अशा प्रयोगांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही. नवीन साखर कारखाने उभारणे आता अजिबात हिताचे नाही.

या वेळी किसन वीर कारखान्याच्या ‘सीएनजी प्रकल्पा’चीही गडकरी यांनी माहिती घेतली. तसेच ‘सीएनजी’बाबत अधिक प्रयोग करायला वाव असून याबाबतही ‘किसन वीर’ परिवाराने प्रयत्न करावेत. साखरेला उत्तम पर्याय ठरणाऱ्या अशा सर्व उपR मांसाठी मदतीचे आश्वासनही गडकरी यांनी भोसले यांनी या वेळी दिले. या वेळी किसन वीर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार अनिल जाधव, कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे उपस्थित होते.

विदर्भ डिझेलमुक्त करणार

जैविक इंधन आणि सीएनजी याची उपलब्धतता मोठय़ा प्रमाणावर करून नजीकच्या काळात संपूर्ण विदर्भ डिझेल मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर विदर्भात हा प्रयोग केला जाणार असून तो यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे. तसेच सांडपाण्यावर आधारित विविध प्रकल्प राबविण्याचे प्रयोग यशस्वी झाले असून त्यालाही चालना दिली जाणार आहे, असेही गडकरी यांनी या वेळी सांगितले.