भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या  बैठकीत व्यक्त केला.

जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे. चोपडा तालुक्यात दोन सभापतीपद भाजपकडे आहेत. तालुका बैठकीत विजय पुराणिक, संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे आदी उपस्थित होते. एका विचारधारेवर पक्ष चालत असून पक्ष वाढविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. मी आहे म्हणून पक्ष असल्याचे म्हणणारे आता इतिहासजमा झाले आहेत. आजही जे भाजप सोडत आहेत, त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही महाजन यांनी  नमूद केले. पुराणिक यांनी करोना काळात भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन काम के ल्याचे सांगितले. मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्या. या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. रक्षा खडसे यांनी आपण भाजप विचारसरणीत वाढलो असून चार वर्षांत खासदारकीचे तिकीट मिळो ना मिळो, आपण भाजप सोबतच राहणार, असे सांगितले.