बनावट नोटा तयार करून विकण्याच्या तयारीत असलेला आरोपी माजिद खान बिस्मिल्ला खान (रा.न्यू बायजीपुरा, औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश भोसले यांनी शुक्रवारी (दि.२६) विविध तीन कलमांखाली आठ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ५० हजार रुपये दंड ठोठावला.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने १९ मे २०१७ रोजी आरोपीच्या घरी छापा मारून स्कॅनर प्रिंटर आणि दोन हजाराच्या २१३ नकली नोटा, पाचशेच्या १५२ नकली नोटा आणि १०० च्या ९३ नोटा तसेच दोन हजार रुपयाच्या चार खऱ्या नोटा आणि पाचशे रुपयांच्या ३० खऱ्या नोटा जप्त केल्या होत्या. आरोपीच्या अंगझडतीमध्ये प्रेस लिहिलेले ओळखपत्र, मोबाईल, ए फॉरचे बॉण्ड पेपर ७८, पेन इत्यादींसह ३३ हजार ८११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यासंदर्भात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

खटल्याच्या सुनावणी वेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडे वाडकर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. बनावट नोटा तयार करून विकण्याची तयारी करीत असल्याचे सरकारी पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यावरून न्यायालयाने आरोपीला भादवीच्या कलम ४८९ (ए) आठ वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, कलम ४८९ (सी) नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि कलम ४८९ (ड) नुसार आठ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड ठोठावला अधिकारी म्हणून भीमराव घुगे यांनी काम पाहिले.