शहरातील उद्योजक व बांधकाम व्यावसायिक पुरुषोत्तम बुब यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. व्ही. बुरांडे यांनी दि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अ‍ॅक्टच्या कलम ४ चा भंग केला म्हणून कलम १३ अन्वये ६ महिने तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बुब यांनी प्रभाग क्रमांक ७ मध्ये बालाजी टॉवर्स नावाने बांधलेल्या बहुमजली इमारतीमधील ११ क्रमांकाची सदनिका येथील व्यापारी किशनचंद रेलुमल आहुजा यांना विकत देण्याचे कबूल करून आगाऊ रक्कम स्वीकारली. मात्र आगाऊ रकमेबाबत व ठरलेल्या व्यवहाराबाबत लेखी करारपत्र तयार केले नाही. तसेच आगाऊ रकमेच्या आहुजा यांच्या नावे बँकेत स्वतंत्र खाते ठेवले नाही. आहुजा हप्त्याची पहिली रक्कम घेऊन बूब यांच्याकडे गेले असता त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. तसेच ती सदनिका दुसऱ्या व्यक्तीला विकणार असे सांगितले.
आहुजा यांनी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी फिर्याद दाखल केली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वकील डी. एम. त्रिभुवन यांच्यामार्फत त्यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. कायद्यानुसार या खासगी फिर्यादीचे सरकारी खटल्यात रूपांतर झाले. आहुजा यांच्या विनंतीनुसार त्रिभुवन यांना सरकारी खटला चालविण्यास न्यायालयाने परवानगी दिली. सदर खटल्याच्या चौकशीकामी साक्षीदारांच्या तोंडी जबाबावरून व लेखी कागदपत्रांचे अवलोकन करून न्यायालयाने पुरुषोत्तम बुब यांस ६ महिने तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वकील त्रिभुवन यांना के. एस. भगत यांनी मदत केली.