चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा चाकुने भोकसून खून केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने रुपेश राधाकिसन चौधरी (वय २५, रा. कनकापुरी, संगमनेर) या तरुणाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड भरल्यास आणखी सहा महिने  सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.
राहुरी तालुक्यातील आंबी चारी क्रमांक २ जवळ घडलेल्या या घटनेचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी आज, गुरुवारी दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकिल गोरख मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. योगेश सुर्यवंशी यांनी सहाय केले.
रुपेश चौधरी हा जयश्रीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत होता. घटनेच्या दिवशी, ७ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास, त्याने मोबाईल करुन आंबी चारी क्रमांक २ जवळ जयश्रीला बोलावुन घेतले व तीच्या गळ्यावर चाकुचे वार करुन तिचा खून केला. नंतर रुपेश मोटरसायकलवरुन पळून गेला. नंतर राहुरी पोलिसांनी त्याला अटक केली. खटल्यात एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य़ मानून रुपेशला शिक्षा देण्यात आली.