खासदार इम्तियाज जलील यांची एआयएमआयएमच्या (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुक्तत्याच पार पडलेल्या लोकसभा निडवणुकीत ते औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार होते. त्यांनी २० वर्षांपासून औरंगाबादचे खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या ४४९२ मतांनी मतांनी पराभव केला.

त्यांना खासदारकीचे तिकीट मिळण्या अगोदर ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. विधानसभेतही त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांना पक्षाकडून महत्वाचे पद देण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे . या निवडणूक याचिकेवर १३ जुलै रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील बहुजन महापार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही निवडणूक याचिका सादर केली आहे. त्यांना १२१० मते मिळाली आहेत.

या निवडीनंतर खासदार जलील यांनी लोकसत्ता प्रतिनिधीशी संवाद साधतांना सांगितले की, भविष्यात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समर्थ पर्याय उभा करणं, माझ्या समोरचे आव्हानात्मक कार्य असेल. गत विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागा लढवल्या होत्या, आता ५० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. ज्या ठिकाणच्या जागांवर एमआयएमचा दावा असेल अशा जागांची यादी प्रकाश आंबेडकरांना पाठवली आहे.