धवल कुलकर्णी

सध्या सगळा देश करोना व्हायरसशी लढतो आहे. महाराष्ट्रातही करोनाग्रस्तांची संख्या भरपूर आहे. अशात औरंगाबादच्या बिअर कंपन्या या जर शहरातल्या करोनाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत देऊ शकत नसतील तर त्यांना पाणी का पुरवलं जातं? असा प्रश्न औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. सध्या औरंगाबादकर करोना व्हायरसशी लढा देत आहेत. अशात औरंगाबादमध्ये असलेल्या बिअर कंपन्या या नागरिकांसाठी असलेल्या पाण्याचा वापर मद्य आणि बिअर बनवण्यासाठी करत आहेत. मात्र करोना संकटाशी लढण्यासाठी आर्थिक किंवा इतर मदत करत नाहीत अशी तक्रार जलील यांनी केली आहे.

औरंगाबादला महाराष्ट्राचे बिअर कॅपिटल म्हणून ओळखले जाते कारण तिथे सहा बिअरचे कारखाने आहेत. अशी धारणा आहे की गोदावरी नदीचे पाणी वापरल्यामुळे बिअर ला वेगळी चव येते. “औरंगाबाद मध्ये सहा बिअर कंपन्या आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून औरंगाबादसाठी कोणताही खर्च केलेला नाही. कदाचित ते हा निधी अन्य ठिकाणी वापरत असतील पण त्यांचा फायदा जर औरंगाबाद शहराला आणि इथल्या रहिवाशांना होत नसेल तर या कंपन्यांना लोकांच्या तोंडचं पाणी का द्यावं?” असा प्रश्न ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच जे आय एमआयएमचे खासदार असलेल्या माजी पत्रकार जलील यांनी केला.

उद्योग आणि समाज यांचा यांच्यात परस्पर संबंध असतो. लोकांसाठी असलेली संसाधने या कंपन्या वापरतात मात्र ज्या वेळेला करोना विरोधातला लढा सुरू आहे त्यावेळेला ही मंडळी पैसे किंवा मेडिकल साहित्य द्यायला पुढे येत नाहीत. औरंगाबाद मध्ये काही वस्त्यांमध्ये आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी येतं पण प्रशासन त्याच वेळेला बिअर बनवण्यासाठी पाण्याचा वापर होऊ देतं, अशी तक्रार जलील यांनी केली.

मी औद्योगिकीकरणाच्या विरोधात नाही पण आपण ज्या समाजाच्या संसाधनांचा वापर करतो त्या समाजाला आपण देणे सुद्धा लागतो याचं उद्योगपतींनी भान ठेवायला हवं असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पाण्याच्या वापरामध्ये पहिले प्राधान्य पिण्यासाठी मग गुरांसाठी शेतीसाठी शेवटी उद्योगांसाठी असतं असे त्यांनी नमूद केले.

त्याचबरोबर सोमवारपासून जरी वाईन शॉप उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरीसुद्धा जलील त्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. समजा औरंगाबाद मध्ये दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली तर लॉकडाउनचे उल्लंघन करून आपण महिलांसोबत रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना रातोरात आदेश काढून दुकाने बंदच राहतील असे सांगावे लागले.

मात्र इतर ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर लोक वाइन शॉप्सच्या रांगेत उभे आहेत अशी दृश्यं आणि फोटो आल्यानंतर ह्या लोकांचे रेशन कार्ड रद्द केले पाहिजेत कारण त्यांच्याकडे दारू विकत घ्यायला पैसे असतील तर अन्न विकत घ्यायला तर नक्कीच असतील. यांचे रेशन कार्ड रद्द करून खऱ्याखुऱ्या गरजूंना रेशन वरचे अन्न द्यावे अशी मागणी जलील ह्यांनी केली.