औरंगाबादमध्ये सोनिया गांधी महासंघाच्या नावाखाली बचत गटाची नोंदणी सुरु आहे. नोंदणी केलेल्या बचत गटांना सुरुवातीला १५ हजार आणि त्यानंतर नऊ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. आज औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद संशोधन केंद्रात त्याची नोंदणी करण्यात आली.

जिल्हाभरातून शेकडो महिला या बचत गटाच्या नोंदणीसाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या. २५ तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यात सहभागी असतील त्यांना योजनांचा लाभ मिळेल असे नोंदणी ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर म्हटले आहे. मोर्चासाठी गर्दी जमवण्याचा हा फंडा आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहे.

या संदर्भात काँग्रेस नेते आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता काँग्रेस पक्षाचा या बचतगटांशी काहीही सबंध नाही. महिलांची दिशाभूल करून लूट करण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असून सोनियगांधींचे नाव घेऊन जो प्रकार सुरू आहे. त्याविरोधात कारवाई करायला हवी असे मते काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.

जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या आहेत. यावेळी महिलांना आधार कार्डची दुय्यम प्रत आणि फोटोसह अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.