चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासांत ४८ करोनाबाधित आढळले असून, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १ हजार ३५४ वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ४४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर ८९३ बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने अँन्टीजन चाचणी सुरू असून लक्षणं दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गणपती वॉर्ड, बल्लारपूर येथील ७९ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या करोनाबाधिताला करोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. त्याला २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ .३५ वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दिनांक २१ ऑगस्टच्या रात्री एक वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तर तेलंगाणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.आज चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित आढळले आहेत.

नामांकीत बिल्डरचा करोनामुळे मृत्यू

शहरातील नामांकीत बिल्डर भरत राजा(६५) यांचा आज सायंकाळी सात वाजता नागपुरातील खासगी रुग्णालयात करोनामुळे मृत्यू झाला. राजा यांना करोनाची बाधा होताच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना नागपुरात खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.