News Flash

…म्हणून बच्चू कडू घोड्यावरून कॉलेजला जायचे

बच्चू कडू घोडा घेऊन कॉलेजला गेल्यावर शिक्षक चांगलेच संतापायचे पण...

बच्चू कडू

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू हे अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारताना दिसतात. मग तो शेतमालाला हमीभाव मिळवण्यासंदर्भातील प्रश्न असो किंवा पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय असून बच्चू कडू आपल्या भाषणामधून सरकारवर तुटून पडतात. चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या बच्चू कडू यांनी बीडमध्ये नुकतीच एक प्रकट मुलाखत दिली. या मुलाखतीचा विषयच राजकारणापलीकडचे बच्चू कडू असा असल्याने मुलाखत फारच रंगतदार झाली. बच्चू कडू यांनी या मुलाखतीमध्ये अनेक किस्से सांगितले. मुलाखतीची सुरुवातच त्यांनी अगदी मजेदार उत्तर देत केली.

मुलाखतकाराने मुलाखतीच्या सुरुवातीलाच बच्चू कडू यांना त्यांच्या महाविद्यालयीन जिवनासंदर्भातील प्रश्न विचारला. “आपण महाविद्यालयामध्ये घोडा घेऊन गेला होता. का बरं असं केलं होतं आपण?,” असा पहिलाच प्रश्न विचारल्यानंतर बच्चू कडू स्वत:शीच हसले. त्यानंतर त्यांनी यामागील कारण सांगितलं. “सगळे अधिकारी, मास्तर आणि व्यापारांची पोरं गाडी घेऊन यायचे,” अशी कडू यांनी उत्तराला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “मी शेतकऱ्याचा पोट्ट्या (पोरगा) असल्याने मी घोडे घेऊन जायचो,” असं कडू यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी घोडा घेऊन कॉलेजला गेल्यावर शिक्षक चांगलेच संतापायचे असही कडू यांनी सांगितलं. “त्यावेळी शिक्षक मला म्हणायचे तो घोडा घेऊन येत जाऊ नकोस. त्यावेळी मी त्यांना म्हणायचो मग त्या इतर पोरांनाही गाडी न आणण्यास सांगा, असं मी म्हणायचो,” अशी आठवण कडू यांनी सांगितली. “पहिल्यांदा घोडा घेऊन गेलो तेव्हा मास्तरची उंची कमी असल्याने मी त्यांना घोड्यावर असल्याने जास्त वर पहावं लागायचं”, असंही कडू यांनी हसत सांगितलं.

“घोडा घेऊन जाण्याचा काही फायदा तुम्हाला झाला का?,” असा सवाल मुलाखतकाराने पुढे विचारला. “घोडा घेऊन जाण्याचा मला चांगलाच फायदा झाला. माझ्यावर नजर होती सगळ्यांची,” असं उत्तर बच्चू कडू यांनी या प्रश्नाला दिलं. त्यावेळी मुलाखतकाराने मुली वगैरे बघत असतील तुमच्याकडे अशा संदर्भातील प्रश्न बच्चू कडू यांना विचारला. “नाही तेव्हा असं काही नव्हतं. तुम्ही म्हटल्यावर माझ्या डोक्यात आलं हे,” असं मिश्कील उत्तर बच्चू कडू यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 2:02 pm

Web Title: in college days bacchu kadu use to go on horse scsg 91
Next Stories
1 “प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी, परंतु चर्चेतून मार्ग निघेल”
2 “बाई जरा दमानं घ्या”; अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना वादात ‘मनसे’ची उडी
3 … तर तुमची गाठ शिवसेनेशी; धैर्यशील मानेंचा इशारा
Just Now!
X