15 August 2020

News Flash

देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मी कृषी मंत्रिपद मागून घेतले होते – थोरात

शेतकरी मेळाव्यात महसूल मंत्री थोरात यांनी कृषिमंत्री म्हणून केलेल्या कामाला उजाळा दिला.

बाळासाहेब थोरात

श्रीरामपूर : मला लहानपणापासून कृषिमंत्री व्हावे, असे वाटत होते. त्यामुळे स्वर्गीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना कृषी मंत्रिपद मागून घेतले. केंद्रात शरद पवार तर राज्यात मी कृषिमंत्री होतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला राजकीय कालखंड होता, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी मेळाव्यात महसूल मंत्री थोरात यांनी कृषिमंत्री म्हणून केलेल्या कामाला उजाळा दिला. कृषिमंत्री दादा भुसे, आमदार लहू कानडे, प्रकाश गजभिये यांनी त्याला दाद दिली. विशेष म्हणजे कृषिमंत्री भुसे यांचेही थोरात यांनी कौतुक केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कृषी मंत्रिपद घ्यायला कोणी तयार नसते. मुख्यमंत्री असताना स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी मला कोणते मंत्रिपद हवे, अशी विचारणा केली. केंद्रात १८ वर्ष अण्णासाहेब शिंदे हे माझे मामा कृषिमंत्री होते. त्यामुळे मला लहानपणापासून कृषिमंत्री व्हावेसे वाटत होते. त्यामुळे मी मंत्रिपद मागून घेतले. केंद्रात शरद पवार हे कृषिमंत्री होते. तर राज्यात मी. हा राजकीय आयुष्यातला सर्वात चांगला कालखंड ठरला. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी भरीव काम या कालखंडात करता आले. मी विभागनिहाय रब्बी व खरीप हंगामाच्या बैठका आयोजित केल्या. या बैठकांना स्वर्गीय देशमुख हजेरी लावत. माझ्या कृषी मंत्रिपदाच्या काळात मुख्यमंत्र्यांची बैठकांना हजेरी हे पहिल्यांदाच घडले. पूर्वी कुलगुरुंना बैठकांमध्ये व्यासपीठावर स्थान नव्हते ते मी दिले. कृषिमंत्र्याच्या शेजारी बसविले. संशोधनाचे सादरीकरण करायला लावले. कृषी विद्यापीठात शिवारफेरीचा कार्यक्रम सुरू केला, असे ते म्हणाले.

कृषी हे महत्त्वाचे खाते आहे. पण गेल्या पाच वर्षांत चांगला कृषिमंत्री मिळाला नाही. कृषिमंत्री म्हणून नाव घ्यावे असे काम गेल्या पाच वर्षांत झाले नाही. हा विभाग गेली पाच वर्ष चांगल्या मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होता. आता भुसे हे चांगले कृषिमंत्री मिळाले आहेत. ते कृषी क्षेत्राला नवी दिशा देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यामुळेच त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, असे थोरात म्हणाले.

विद्यापीठाच्या बियाणांचा वापर

मी राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी संगमनेरला वकिली व शेती करत होतो. त्यावेळी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मोटारसायकलवर येऊन बियाणे घेऊन जात असे. विद्यापीठाने काय काम केले, असा प्रश्न विचारला जातो. विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने उसाच्या अनेक जाती शोधल्या. डाळिंब, बोर यासह फळबागेत चांगले काम केले. विद्यापीठाने संशोधनाचे पेटंट घेतले पाहिजे, असे महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्र्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले

शेतकरी मेळाव्यात शिवसैनिकांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कृषिमंत्री भुसे यांच्या नावाने घोषणा दिल्या. मात्र हा शिवसेनेचा कार्यक्रम नाही, याची आठवण भुसे यांनी शिवसैनिकांना करुन दिली. मंत्र्यांबरोबरच शेतकऱ्यांकरिता भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र भुसे यांनी घरून डबा आणला होता. या डब्यातील ज्वारीची भाकरी व मिरचीच्या ठेच्याचा आस्वाद आमदार गजभिये व कानडे यांनीही घेतला. घरून डबा आणणारे भुसे हे पहिलेच मंत्री असल्याचे गजभिये यांनी यावेळी सांगितले. सध्या मी कृषी विभागाचा अभ्यास करत आहे. त्यानंतर मी निर्णय घेईन, असे भुसे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 12:27 am

Web Title: in deshmukh cabinet i sought of agriculture minister balasaheb thorat zws 70
Next Stories
1 CAA बाबत आता शेतकरी संघटनाही घेणार भूमिका
2 सावरकर-गोडसेंबाबत अपशब्द वापरले गेले तेव्हा राऊत गप्प का बसले?- चंद्रकांत पाटील
3 ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकावर उदयनराजे उद्या स्पष्ट करणार ‘सडेतोड’ भूमिका
Just Now!
X